२० जून हा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. विधान परिषदेची निवडणूक त्यादिवशी होती आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि काही आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात खळबळ उडाली. हे सगळे आमदार नॉट रिचेबल झाले. पुढे काय झाले हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे.
३० जूनला मग महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायऊतार व्हावे लागले. ३० जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीही झाले. म्हणूनच २० जून हा दिवस महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या बाबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात प्रचंड रोष, राग, संताप आहे. तो ते आपल्या भाषणांमधून, सभांमधून बाहेर काढत असतात. त्यांना गद्दार, खोके, पालापाचोळा, कचरा असे अश्लाघ्य भाषेत डिवचत असतात. लोकांना आता ही टीका रोजचीच झालेली आहे. लोकांना त्याचा कंटाळाही आलेला आहे. पण ते राजकारण आहे, असे म्हणत लोक त्याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. पण त्यासाठी थेट २० जून हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्याची काय आवश्यकता? हा बालिश राजकारणाचा एक भाग झाला.
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून हा दिवस गद्दार दिन म्हणून नोंद करा असे पत्र पाठविल्याचे वृत्तही होते. एकूणच हे राजकारणाचा स्तर किती खाली गेला आहे, याचे द्योतक म्हणावे लागेल. जणू काही जगात प्रथमच २० जून हा दिवस उजाडला आणि त्यात कुणीतरी एका पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात गेले किंवा वेगळी वाट चोखाळली. याआधी जगभरात फक्त निष्ठेचा महापूरच वाहात होता. कुणीही कधीही एका पक्षातून बाहेर पडलाच नव्हता. पण शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याचा फटका अर्थातच उद्धव ठाकरे यांना बसला आहे. त्यांची सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेले आणि पक्षाचीही वासलात लागली. अशा परिस्थितीत शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर विखारी टीका करणे हे स्वाभाविक आहे.
हे ही वाचा:
अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले
रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!
तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !
फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद
हे सगळे बालीश असले तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने उतरण्याचे कारण कळण्यापलिकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही आमदार या सगळ्यात बाहेर पडला नाही की या पक्षाचे नुकसान झालेले नाही. नुकसान झाले ते फक्त उद्धव ठाकरे यांचे. त्याबद्दल हळहळ वाटणे ठीक आहे पण थेट गद्दार दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रवादीचेच नेते, पदाधिकारी रस्त्यांवर उतरले. खोके जाळून, खोके एकमेकांवर ठेवून, टाळ वाजवून, घोषणाबाजी करून आंदोलने केली गेली. काही लोक तर गद्दार दिनी तुरुंगातही जाऊन आले. राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकी ही गरज का वाटली असावी?
मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा काही शून्यातून उभा राहिलेला पक्ष नाही. त्यांच्या पक्षात निवडून येण्याची क्षमता असलेले लोक होते त्यापासून तो पक्ष तयार झाला. त्यात नंतर इतर पक्षातील लोकही सामील झाले. प्रताप सरनाईक, आनंद परांजपे, गणेश नाईक, भास्कर जाधव आणि छगन भुजबळही. मग या सगळ्या नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले तेव्हा त्यांना गद्दारी म्हणजे काय, दुसऱ्या पक्षाचे त्यामुळे काय नुकसान होईल, याची तमा नव्हती का? अगदी भुजबळांचे उदाहरण घेतले तर शिवसेनेतून जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर मोठा हल्ला होणार होता, पण ते कसेबसे बचावले. मग त्यावेळी त्यांच्याप्रती किती संताप शिवसैनिकांना होता? तरीही भुजबळांनी राष्ट्रवादीने स्थान दिले. मग आता शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बाहेर पडलेल्या आमदांना गद्दार म्हणण्याचे राष्ट्रवादीला काय कारण? आपणही दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना स्थान दिलेच ना!
बरे, या सगळ्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेही उतरल्या. सुप्रिया सुळे यांना नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या कामाचा आवाका वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी अशा फुटकळ खोके, गद्दार दिन आंदोलनात सहभागी व्हायचे म्हणजे हास्यास्पदच ठरते. खोके हातात घेऊन गद्दार, खोके अशा घोषणा द्यायच्या हे राष्ट्रीय स्तरावरील एका नेत्याला, खासदाराला तेही संसदरत्न ठरलेल्या नेत्याला शोभत नाही.
यात एक शंका घ्यायला नक्की वाव आहे की, महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा स्थापन झाले त्यात राष्ट्रवादीचा मोठा हात होता. स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना गळ घातली होती आणि अर्थात उद्धव ठाकरेंचीही महत्त्वाकांक्षा होतीच. पण ते सगळे अनुकूल वातावरण पाहून शरद पवारांनी आपल्या पक्षाला सत्तेत राहता येईल हा स्वार्थ ओळखून उद्धव ठाकरे यांना आपल्या जाळ्यात ओढले. हीच बाब शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना आवडलेली नाही. त्यातूनच त्यांनी हे बंड केलेले आहे हे त्यांनी याआधीही सांगितलेले आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत कशाला जायचे हीच त्यांची भूमिका होती. पण तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांचे मन मोडून ही आघाडी उघडली. त्यामुळेच काही कालावधीनंतर या सगळ्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मग आता निदान त्याला उतराई होण्याची संधी आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिनात सहभाग घेतलेला नाही ना? कारण सत्तेत येण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे शिवसेनेचे वाटोळे झाले आता ते झालेच आहे तर निदान गद्दार दिनात सहभागी होऊन त्यांच्यासोबत आपण आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न तर राष्ट्रवादी करत नाही ना?