विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला प्रवेश दिल्याबद्दल दिल्ली ते लेहपर्यंत कार्यरत असलेल्या दोन वैमानिकांना एअर इंडियाने निलंबित केले आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली. ही घटना ३ जून रोजी घडली होती. २७ फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली विमानप्रवासात कॉकपिटमध्ये मैत्रिणीला प्रवेश दिल्यानंतर एअर इंडियाने नुकतेच एका वैमानिकाला निलंबित केले होते. त्यानंतर ही नवी घटना समोर आली आहे.
ही घटना AI 445 विमानाने गेल्या आठवड्यात दिल्लीहून उड्डाण घेतल्यानंतर घडली. तेव्हापासून दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आले आहे. ही मैत्रिण एक ज्येष्ठ हेलिकॉप्टर वैमानिक होती, जी त्या दिवशी या विमानातून प्रवासी म्हणून प्रवास करत होती. दिल्लीत विमान उतरल्यानंतर या प्रकरणाची औपचारिक तक्रार एका पुरुष कर्मचाऱ्याने केली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) याबाबत कळवण्यात आले असले तरी त्यांनी या वैमानिकांवर कोणती कारवाई केली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम
‘लिव्ह-इन रिलेशनशिपला विवाह म्हणून कायद्याची मान्यता नाही’
वसईत धर्मांतरप्रकरणी मुंब्र्यातून एकाला अटक
क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या
याबाबत काही वैमानिकांचे मात्र वेगळे मत आहे. ‘ही काही असामान्य परिस्थिती नाही आणि ती केवळ एअर इंडियापुरती मर्यादित नाही. एअरलाइन्समधील वैमानिक प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊनच त्यांच्या मित्रांशी केवळ गप्पा मारण्यासाठी त्यांना कॉकपिटमध्ये येण्यासाठी परवानगी देत आहेत,’ असे मत माजी वैमानिकाने व्यक्त केले. मात्र एअर इंडियाच्या प्रवक्त्याने आपली बाजू मांडली. ‘एअर इंडिया प्रवाशांची सर्व प्रकारची सुरक्षाव्यवस्था ठेवण्यास कटिबद्ध आहे. तसेच, जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची आम्ही अजिबातच तमा बाळगत नाही. अशा प्रकारे उल्लंघन करणाऱ्यांवर गंभीरपणे कारवाई केली जाते आणि त्यांच्यावर निर्बंध लादले जातील,’ असे स्पष्टीकरण एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिले आहे.