भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) बहुप्रतीक्षित निवडणुका ६ जुलै रोजी होणार असल्याचे निवडणूक अधिकारी महेश मित्तल कुमार यांनी मंगळवारी रात्री एका निवेदनाद्वारे जाहीर केले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याच्या एक दिवसानंतर ही घोषणा झाली आहे. निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी लागतील.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्याच्या उद्देशाने १२ जून रोजी मित्तल यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. कुस्ती महासंघ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए)शी संलग्न सदस्य आहे.
इलेक्टोरल-कॉलेजसाठी नावे प्राप्त करण्याची अंतिम तारीख १९ जून आहे. निवडणुकीसंदर्भातील छाननी वगैरे बाबी २२ जूनपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे मित्तल यांनी नोटिशीमध्ये म्हटले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या घटनेनुसार, इलेक्टोरल-कॉलेजमध्ये ५० मते असतील. प्रत्येक राज्य युनिट प्रत्येकी एक मत असलेले दोन प्रतिनिधी पाठवू शकतात. फॉर्म २मधील निवडणुकीसाठीचे नामनिर्देशन निवडणूक अधिकाऱ्यांकडे २३ जून रोजी वैयक्तिकरीत्या सादर केले जातील. याची मुदत २५ जूनपर्यंत असेल.
हे ही वाचा:
दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार
अमेरिकी राजदूत डोभालबद्दल म्हणाले, उत्तराखंडच्या गावातला मुलगा राष्ट्राचा आधार बनला!
क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या
‘बिपरजॉय’चा फटका गुजरातला, ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
उमेदवारी अर्जांची छाननी २८ जून रोजी होणार आहे. उमेदवार २८ जून ते १ जुलै दरम्यान अर्ज मागे घेऊ शकतात. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून इलेक्टोरल कॉलेजच्या स्थापनेसाठी १९ जून, २०२३ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन नामांकन प्राप्त करणे गरजेचे आहे.
कुस्ती महासंघाच्या मान्यताप्राप्त घटनेनुसार आणि युवा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यकारी समितीचे सदस्य निवडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संघटनांपैकी प्रत्येकी दोन व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. भारतीय कुस्ती महासंघात अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, चार उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, दोन सहसचिव आणि पाच कार्यकारी सदस्य या पदांसाठी ही निवडणूक होईल.