राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे. रविवारी संध्याकाळी शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे पवारांच्या भेटीला पोहोचले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाचाही मानली जात आहे.
शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिले. या पत्रात सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी पोहोचवण्याचे आदेश गृहमंत्र्यानी दिल्याचा धक्कादायक आरोप या पत्रात केला आहे. या पत्रानंतर देशात एकच खळबळ उडाली. या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनिल देशमुख ह्यांच्या बाबतीत सहकाऱ्यांशी चर्चा करून उद्यापर्यंत निर्णय घेऊ असे सांगितले. अशातच संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. रविवारी संध्याकाळी संजय राऊत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटी दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अंदाजे १५ मिनिटे चर्चा झाली. पण या चर्चेत नेमके काय झाले याचे तपशील कळू शकलेले नाहीत. पण ही भेट परमबीर सिंह यांचे आरोप आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा या विषयांवर चर्चा करण्यासाठीच झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
संजय राऊत यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्याच वेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ हे देखील पवार यांच्या भेटीला दाखल झाले. पण या बैठकीतही नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक असल्याचे सांगितले जात असले तरीही ह्या बैठकीला कमलनाथ कसे पोहोचले यावर अजून कोणताही उलगडा झालेला नाही.