महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात झालेल्या चर्चेनुसार आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुका भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. सकाळी अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावरून वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात असून या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली असेल असे कयास बांधले जात आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी काहीही म्हटलेले नाही. पण आगामी निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना एकत्र लढणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमित शहांशी झालेल्या भेटीत या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह
एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?
आयपीएल फायनलनंतर ऋतुराज गायकवाडची उत्कर्षाशी जोडी जमली!
खरेतर आता या सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकांसाठीही सगळे पक्ष सज्ज होत आहेत. जागावाटपावरूनही बैठका घेतल्या जात आहेत, त्याविषयीचे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे या भेटीमागे वेगळे कंगोरे आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. पण त्यावर या बैठकीत चर्चा झाली आहे की नाही हे कळलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी मात्र या भेटीनंतर ट्विट करत या भेटीमागील कारणमीमांसा स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार आहोत.