बालासोर रेल्वे अपघातस्थळी रेल्वे रुळ पुन्हा कार्यान्वित झाले आहेत. अप आणि डाऊन मार्गावर रेल्वेची ये-जा करण्यासाठी दोन्ही रेल्वेमार्ग तयार असल्याची माहिती देत असताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर झाले. बेपत्ता असलेल्या लोकांविषयी बोलताना ‘आमची जबाबदारी अद्याप संपलेली नाही,’ असे त्यांनी सांगितले.
ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे रुळ पुन्हा मोकळे होऊन कार्यान्वित झाल्याची माहिती अश्विनी देत होते. त्यावेळी त्यांचा गळा दाटून आला. ‘दोन्ही मार्गांवरील रेल्वेरुळ आता मोकळे करण्यात आले आहेत. एका मार्गाचे काम दिवसभरात पूर्ण झाले होते. आता दुसऱ्या मार्गाचे कामही पूर्ण झाले आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर ते बेपत्ता प्रवाशांबाबत माहिती देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. ‘बेपत्ता प्रवाशांची त्यांच्या कुटुंबीयांशी लवकरात लवकर भेट घडवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची जबाबदारी अद्याप संपलेली नाही,’ असे ते म्हणाले.
बालासोरमध्ये २४ तास युद्धपातळीवर रेल्वेरुळ मोकळा करण्याचे काम सुरू आहे. अश्विनी वैष्णव सातत्याने कामाचा आढावा घेत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत रेल्वेरुळांवरील डबे बाजू हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर दिवसभरात रेल्वेमार्ग पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाले. रात्रभर जागून अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे रुळ कार्यान्वित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
हे ही वाचा:
‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल
प्रयागराजमध्ये महिला पोलिसालाच बसला ‘लव्ह जिहाद’चा फटका
रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार अदानी, सेहवाग उचलणार
उद्धव ठाकरेंचा गट म्हणजे चायनीज शिवसेना
रविवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी धावली पहिली ट्रेन
घटनेच्या ५१ तासांनंतर, रविवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी या मार्गावरून पहिली ट्रेन चालवण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी येथून मालगाडीला रवाना केले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी विजाग बंदरातून राउरकेला स्टील प्रकल्पात जात होती. ही मालगाडी त्याच रेल्वमार्गावरून धावली, जिथे बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. आता या भागातील सर्व रेल्वेगाड्यांची वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.