वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगेल. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यामध्ये खेळाच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून खेळवला जाईल. भारताने काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ने पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघ ताज्या दमाने मैदानावर उतरेल. भारत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. याआधी सन २०२१मध्ये साऊथम्पटन येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझिलंडने भारताला आठ विकेट्स राखून पराभव केले होते. आयसीसीनेही खेळामध्ये रंजकता वाढविण्यासाठी नियमात काही बदल केले आहेत.
‘सॉफ्ट सिग्नल’ नियम रद्दबातल
अंतिम सामन्यात यंदा ‘सॉफ्ट सिग्नल’चा नियम लागू केला जाणार नाही. म्हणजे मैदानावरील पंचांना निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपविण्याआधी ‘सॉफ्ट सिग्नल’ देण्याचा अधिकार राहणार नाही. याआधी जर मैदानावरील पंचाला कोणताही निर्णय देताना तिसऱ्या पंचाची गरज भासल्यास त्याला आधी ‘सॉफ्ट सिग्नल’ द्यावा लागत असे.
१ जूनपासून हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात लागू केला गेला आहे. सॉफ्ट सिग्नलबाबत याआधी काही वादही झाले आहेत. या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान मार्नस लाबुशेन याला मैदानावरील पंचांनी ‘सॉफ्ट सिग्नल’च्या आधारे झेलबाद घोषित केले होते. स्लिपमध्ये घेतला गेलेला हा झेल स्पष्ट नव्हता, मात्र तिसऱ्या पंचाकडे मैदानी पंचाचा निर्णय बदलण्यासाठी ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राहिला.
हे ही वाचा:
१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना! राजीनामा मागणाऱ्यांनो रेल्वेमंत्र्यांची योग्यता तर पाहा!
‘फ्लड लाइट्स’मध्ये सामना रंगण्याची शक्यता
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रंगणाऱ्या सामन्यात ढगाळ वातावरण व नैसर्गिक प्रकाशाअभावी ‘फ्लड लाइट्स’चा सामना करावा लागू शकतो. तसेच, या सामन्यासाठी १२जूनचा दिवसही राखीव ठेवण्यात आला आहे.
हेल्मेटसाठीही आहे नियम आयसीसीने १ जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान कठीण परिस्थितीमध्ये हेल्मेट घालणे अनिवार्य केले होते. त्यामुळे जलदगती गोलंदाजांचा सामना करताना हेल्मेट परिधान करावेच लागेल. जेव्हा यष्टीरक्षक यष्टींच्या जवळ आणि खेळाडू फलंदाजाच्या समोर आणि खेळपट्टीच्या जवळ असतील तेव्हा त्यांना हेल्मेट परिधान करणे गरजेचे असेल.