अंतराळवीरांना प्रथमच अंतराळात सोडण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. या मोहिमेदरम्यान विविध तांत्रिक बाबींवर काम केले जात आहेच, मात्र अंतराळात भारतीयांना पोषक आहार मिळावा, यासाठीही विविध प्रयोग केले जात आहेत. त्यांना भारतीय अन्न दिले जाणार आहे. त्यासाठी अनेक संस्था विशेष खाद्यपदार्थ विकसित करण्यावर काम करत आहेत. मात्र या मेनूमध्ये सध्या तरी इडलीचा समावेश नसल्याचे दिसत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना त्यांच्या मोहिमेदरम्यान भारतीय जेवण दिले जाईल. अनेक संस्था या प्रवासासाठी विशेष खाद्यपदार्थ आणि मेनू विकसित करण्यावर काम करत आहेत. सुरुवातीच्या अल्प-मुदतीच्या मोहिमांमध्ये इडली सांबारचा मेनूमध्ये समावेश नसेल. त्याऐवजी अंतराळवीर एकाच प्रकारच्या जेवणाचे नळ्यांमधून सेवन करतील.
तथापि, दीर्घ कालावधीच्या मोहिमेदरम्यान, त्यांना चिकनसह विविध प्रकारचे अनुकूल खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील. अन्नाचे स्वरूप आपण पृथ्वीवर जे खातो त्याप्रमाणेच असेल. भारतीय अंतराळवीरांच्या निवड प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती दिली. भारतीय हवाई दल हे अंतराळवीरांसाठी प्राथमिक स्त्रोत आहेत, कारण त्यांच्याकडे अशा वातावरणाचा सामना करण्यास सक्षम अनुभवी वैमानिक आहेत. त्यांना सध्या अंतराळवीर उमेदवार म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे.
हे ही वाचा:
ओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष
अमित शहा इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत
ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती
बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम
इस्रोने भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची देशाच्या ‘गगनयान’ या मानवीय अवकाश मोहिमेसाठी निवड केली आहे. हे वैमानिक अंतराळवीर प्रशिक्षणार्थी म्हणून सामील झाले आहेत आणि सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या संदर्भात यापूर्वी अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार्या राष्ट्रांकडूनही इस्रोने मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या नेमक्या तारखेबाबत सांगण्यास सोमनाथ यांनी नकार दिला. सध्या आमचे लक्ष्य अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्याचे आहे, असे त्यांनी नमूद केले.