दिल्ली पोलिसांनी रविवारी कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्ह्याची नोंद केली.
काही कुस्तीपटू रात्री जंतरमंतरवर निषेध करण्यासाठी आले होते, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना परत पाठवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. नवी संसद भवनाकडे कूच करत असताना आंदोलक कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या काही तासांनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एफआयआरवर प्रतिक्रिया देताना विनेश फोगट यांनी एक नवा इतिहास लिहिला जात असल्याचे म्हटले आहे. ‘लैंगिक छळाचा आरोप असणाऱ्या बृजभूषण सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांना सात दिवस लागतात. मात्र शांततापूर्ण आंदोलन केल्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल करायला सात तासही लागले नाहीत. देश हुकूमशाहीकडे वळला आहे का? सरकार आपल्या खेळाडूंशी कसे वागते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. एक नवा इतिहास लिहिला जात आहे,’ असे विनेश फोगटने ट्वीट केले आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया यालाही संसदेच्या दिशेने जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. रस्त्यावर उतरणे हा आपला हक्क असल्याचे सांगत आंदोलकांनी याला ‘शांततापूर्ण’ मोर्चा म्हटले. पुनियानेही ट्विटरवर जाऊन त्याच्या पोलिस कोठडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“पोलिसांनी मला त्यांच्या ताब्यात ठेवले आहे. ते काहीही सांगत नाहीत. मी काही गुन्हा केला आहे का? बृजभूषण तुरुंगात असायला हवे होते. आम्हाला तुरुंगात का ठेवले आहे?’, असा प्रश्न पुनियाने उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…
शिक्षणविरोधी तालिबानच्या नाकावर टिच्चून ती झाली आयआयटी पदवीधर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘संग्रहालयांची बात’
नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए… पंतप्रधान मोदींनी दिला नवा मंत्र
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विविध राज्यांतील खाप पंचायती, शेतकरी आणि समर्थक कुस्तीपटूंनी संसद भवनाजवळ ‘महिला सन्मान महापंचायत’ आयोजित करण्याची घोषणा केली होती. आंदोलकांवर कडक कारवाई करत पोलिसांनी जंतरमंतरवरील तंबू हटवले आणि आंदोलनस्थळ मोकळे केले. तसेच, आंदोलकांवर दंगल घडवणे, बेकायदा सभा आयोजित करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणणे आदी कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.