२८ मे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या स्वातंत्र्यवीरांना अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. याच अंदमानमध्ये प्रख्यात व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे जयंतीदिनी व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीरांचे चरित्र घराघरात पोहोचवणे का आवश्यक आहे, हे तळमळीने सांगितले.
अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, ते पाहण्यासाठी बाहेरून लोक येत आहेत. त्याची नोंद घेतली जात आहे. इथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोक येतात. पुण्यतिथीला सर्वाधिक लोक येतात. व्याख्यानातून जेव्हा स्वातंत्र्यवीरांबद्दल सांगतो तेव्हा सावरकरांबद्दलची ही माहिती आपण कधी ऐकली नव्हती अशी लोकभावना असते. अनेकांना सावरकरांचे चरित्रही माहीत नाही. तेव्हा चरित्राच्या माध्यमातून सावरकर पोहोचविता आले तर योग्य होईल.
ते म्हणाले, सावरकर सर्वार्थाने प्रत्येकाला मान्य होतीलच असे नाही. कारण समोरचा माणूस हा विचारांशी जुळवून घेईल असेही नाही. सावरकरांच्या विचारांशी कदाचित काही लोक सहमत नसतीलही. पण त्यांनी केलेले हिंदू संघटन, भोगलेल्या यातना, त्यांच्यातील प्रखर देशभक्त कवी, लेखक, नाट्यलेखक हे पैलू लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर? शेवडे म्हणाले की, वर्षातून एकदा कधी दोनदा अंदमानमध्ये येतो. लोकांना सहा दिवस चरित्ररूपी सावरकर उलगडून सांगता यावेत ही त्यामागची भावना. लोकांना सावरकरांसंदर्भातील साध्या गोष्टीही अनेकवेळा माहीत नसतात. इथे आल्यावर काळे पाणी कुठे दिसते असे लोक विचारतात. काळे पाणी हा वाकप्रचार आहे, हे सांगावे लागते. काळ्या पाण्यावर पाठवले म्हणजे परत येणे नाही, हा त्याचा अर्थ आहे. सावरकरांनी समुद्रात उडी मारण्याचा पराक्रम केला तो कुठे केला असाही प्रश्न विचारला जातो. तो पराक्रम फ्रान्सला मार्सेलिसला झाला इथे नाही, हे सांगावे लागते.
डॉ. शेवडे यांनी खंत बोलून दाखविली की, एका वाहिनीवर काही मुलांना सावरकरांचे पूर्ण नाव विचारले. कुणालाही सांगता आले नाही. इतिहासाबद्दलची अनास्था आहे हेच त्यातून दिसून आले. मातीतला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. शेवडे यांनी अंदमानमध्ये दाखविण्यात येत असलेल्या लेझर शोबद्दलही आपले परखड मत मांडले.
ते म्हणाले की, लेझर शो इथे दाखवतात. तो नव्याने करायला हवा. फारच सर्वसमभाव जपणारा, गांधी नेहरू जपणाराही शो आहे. पूर्वीचा शो वाईट होता पण आताच्या शोमध्येही त्रुटी आहे. भाडेही वाढवले आहे. आधी ५० रु. भाडे होते ते आता ३०० रुपये झाले आहे. सावरकरच नव्हेतर तर इथे बंगाली, पंजाबी क्रांतिकारकही इथे होते. त्यांचे कार्यही आपण पोहोचवावे लागेल. त्यामुळे स्वातंत्र्य केवळ अहिंसेने मिळालेले नाही. सशस्त्र क्रांतिकारकांमुळेही मिळालेले आहे, हे सांगावे लागेल. जिथे त्यांना ठेवले तिथे त्या ठिकाणाचा इतिहास सांगायला हवा. वारंवार या गोष्टींचा मारा व्हायला हवा तरच स्वातंत्र्य हे मिळालं नाही तर मिळवलं आहे याची जाणीव होईल.
हे ही वाचा:
डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे १२० सोसायट्यांवर दाखल केले गुन्हे
भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर नवे संसद भवन देशाला अर्पण
नव्या संसद भवनाच्या सौंदर्याला परंपरा, संस्कृतीची झालर
‘आशिष विद्यार्थीने माझी कधीही फसवणूक केली नाही’
डॉ. शेवडे म्हणाले की, सावरकरांची १४०वी जयंती आणि संसद भवनाचे उद्घाटन हा वेगळाच योग आहे. पंतप्रधानांनी हा दिवस निवडला आहे हा योगायोग आहे. सावरकरांच्या जयंतीदिनी उद्घाटन होत आहे त्यामुळे पोटशूळ उठला असेल. या विरोधाला लोकशाही म्हणतात का, लोकशाहीचा गजर करायचा आणि दुसरीकडे मोदींनी आपल्यासाठीच जणू काही राजवाडा बांधलाय असे म्हणायचे. काहीतरी कारण काढ, गालबोट लाव ही काँग्रेसची सवय. सावककरांनी अंदमानाला आपण सामरिक खड्गहस्त व्हावं असं म्हटले होतं पण आपले त्याकडे दुर्लक्ष झाले. पण मोदींनी मोदींनी संरक्षण क्षेत्र सशक्त केले. इथे ५३७ बेटे आहे. इथे घुसखोरी होत होती. न्यूझीलंडही घुसखोरी करत होते. म्यानमार, बांगलादेशानाही घुसखोरी करून पाहिली. हा धोक्याचा इशारा सावरकरांनी दिला होता. पण तो समजण्यासाठी त्यासाठी इतकी वर्षे का लागली?