मुंबई खो खो संघटनेच्या मान्यतेने ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित दत्ताराम भिवा गायकवाड यांच्या स्मरणार्थ आयोजित खोखो स्पर्धेत मुलींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ आणि मुलांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र यांनी विजेतेपद पटकाविले.
ही स्पर्धा मनोरंजन पार्क, पेरू कंपाउंड, लालबाग, मुंबई येथे झाली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माननीय आमदार अजय चौधरी याच्या हस्ते झाला. तसेच बक्षीस वितरणास शाखाप्रमुख किरण तावडे, ओम साईश्वरचे अध्यक्ष प्रदीप वाटाणे, मानद सचिव श्रीकांत गायकवाड, खजिनदार सुरेश खंडागळे, सह-सचिव राजेंद्र तावडे, मुंबई खोखो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा हे उपस्थित होते.
आज खरतर दोन्ही अंतिम सामने एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणार्या लालबाग व परळच्या संघात झाला. त्यात मुलींमध्ये लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने तर कुमारांमध्ये परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने बाजी मारत अजिंक्यपदपदाला गवसणी घातली.
मुलींच्या अंतिम सामन्यात यजमान लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने परळच्या आर्य सेनेचा ८-२ (८-१,१) असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरच्या अथश्री तेरवणकरने ६.२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. काजल मोरेने आक्रमणात २ खेळाडू बाद केले.
कादंबरी तेरवणकरने नाबाद ४.४०, २.४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. ईशाली आंब्रेने ४.२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. पराभूत आर्य सेनेच्या नुपूर आरोलकरने ३.४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. भक्ती बोऱ्हाडेने ३ मिनिटे संरक्षण केले मात्र इतर खेळाडूंकडून चांगली साथ या दोघींना एकाकी लढत द्यावी लागली.
कुमारांच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने यजमान लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा १४-९ (७-५, ७-४) असा ५ गुणांनी पराभव केला. विद्यार्थीच्या जनार्दन सावंतने १.५०, ४.१० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. पियुष काडगेने आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. प्रणय किंजळेने १.३०, १.५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. भावेश बनेने १.००, नाबाद १.५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ओम साईश्वरच्या ओम वाटाणेने १.४०, १.५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. नितेश अष्टमकरने १.४०, १.३० मिनिटे संरक्षण केले. निषाद ताम्हणेकरने २.००, १.४० मिनिटे संरक्षण केले. मात्र यजमान ओम साईश्वरच्या खेळाडूंना निर्णायक क्षणी जोरदार खेळ न करता आल्याने ५ गुणांनी पराभव स्वीकारवा लागला.
हे ही वाचा:
माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस
पावसाची स्थिती यंदा सामान्य, ९६ टक्केचा अंदाज !
माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस
मुलुंडच्या व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करत केली मारहाण
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओम साईश्वरचे अध्यक्ष प्रदीप वाटाणे व मानद सचिव श्रीकांत गायकवाड, खजिनदार सुरेश खंडागळे, सह-सचिव राजेंद्र तावडे व ओम साईश्वरचे सर्व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट संरक्षक – नुपूर आरौलकर (आर्य सेना), ओम वाटाणे (ओम साईश्वर)
सर्वोत्कृष्ट आक्रमक – काजल मोरे (ओम साईश्वर), पियुष काडगे (विद्यार्थी)
अष्टपैलू खेळाडू – अथश्री तेरवणकर (ओम साईश्वर), जनार्दन सावंत (विद्यार्थी)