पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणींचा पाढा कमी होण्याऐवजी आणखीच वाढत असल्याचे चित्र आहे. इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला पोलिसांनी घेराव घातला असून त्यांच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इम्रान खान यांच्या लाहोरच्या जमान पार्क निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या घरात ४० दहशतवादी लपले असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांना २४ तासांत घराबाहेर पडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. असे न झाल्यास पोलिस फोर्सचे पथक इम्रान खान यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांना ठार करतील, असे सांगण्यात आले आहे. यावेळी इम्रान खान यांच्यावरही कडक कारवाई केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचे सूचना मंत्री आमीर मीर यांनी लाहोरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. ‘या आतंकवाद्यांना इम्रान खान आणि पीटीआयने पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे. अन्यथा पोलीस त्यांचं काम करतील,’ असा इशारा दिला आहे. दहशतवादी हे इम्रान खान यांच्या घरात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांद्वारे मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सरकारने पीटीआयला लाहोरमधील माजी पंतप्रधानांच्या जमान पार्क निवासस्थानी आश्रय घेतलेल्या ३०- ४० दहशतवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. इम्रान खान यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच इम्रान खान यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच
“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”
मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान
एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार
इम्रान खानला पाकिस्तान रेंजर्सने ९ मे रोजी न्यायालयाच्या परिसरातून अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार उफाळून आला होता.