‘मुख्यमंत्रिपद ही वडिलोपार्जित मालमत्ता नाही, जी वाटून घेतली जाईल,’ असे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. सिद्धारमय्या यांच्यासोबत कार्यकाळ वाटून घेण्याबाबत त्यांनी स्पष्ट मते मांडली. ‘ही काही वडिलोपार्जित मालमत्ता नाही की भावंडांनी ती एकमेकांत वाटून घ्यावी. हा सरकार स्थापनेचा प्रश्न आहे आणि त्यात वाटणी होऊ शकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यास त्यांचे उपमुख्यमंत्री होण्यास तुमची सहमती असेल का, यावरही त्यांनी याबाबत काहीही चर्चा किंवा अंतिम निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्याही आहेत. तुम्ही सिद्धरामय्या यांना ‘ऑल दे बेस्ट’ म्हणून शुभेच्छा दिल्या, म्हणजे तुम्ही त्यांना मुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शवली आहे, असा याचा अर्थ काढायचा का?, असे विचारले असता त्यांनी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मी कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देईन, असे आश्वासन दिले होते आणि मी माझा शब्द पाळला आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे,’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिध्दरामय्या यांच्याकडे संख्याबळ आहे आणि ते मुख्यमंत्री होणार आहेत, यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘कोण म्हणाले त्यांच्याकडे संख्याबळ आहे? कोणतेही संख्याबळ नाही. एकच संख्या आहे, ती म्हणजे १३५. काँग्रेस आमदारांची संख्या.
सिद्धरामय्या यांची प्रतिमा चांगली आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सरकारचे सरकारने नेतृत्वाची निवड करावी, अशी सिद्धारामय्या यांच्या समर्थकांची मागणी आहे. त्यावरही शिवकुमार यांनी ‘त्यांना स्वप्ने पाहू द्या’, असे सूचक वक्तव्य केले. त्यांना स्वप्ने बघण्यापासून रोखणारा मी कोण? लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नागरिकांना सुशासन देण्याचे आणि पक्षाची प्रतिमा विशेषतः ग्रामीण भागात उभी करण्याचे माझे स्वप्न आहे, असे शिवकुमार म्हणाले.
हे ही वाचा:
वारकऱ्यांना राज्य सरकारकडून भेट! श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता ५ हजार विशेष गाड्या
अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार
‘मशिदीत पुरलेल्या कृष्णाच्या मूर्ती खोदून काढा’
‘जीना यहाँ, मरना वहाँ’ म्हणत न्यायाधीशांनी दिला निरोप
सोमवारी ते दिल्लीत का गेले नाहीत, याबाबतही शिवकुमार यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे माझ्या वाढदिवशी आभार मानायचे होते. ते माझे कर्तव्य होते. शिवाय, माझा रक्तदाबही खूप वाढला होता. आता तो खाली आला आहे,’ असे त्यांनी सांगितले.