टायगर शहा म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती मुकेशभाई आर. शहा हे सोमवारी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी मेरा नाम जोकरमधील ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ हे गाणे गात आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘निवृत्ती स्वीकारणारा मी माणूस नाही. त्यामुळे आता मी आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे,’ अशा भावना शहा यंनी व्यक्त केल्या.
‘मी आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. त्यासाठी देवाने मला शक्ती, धैर्य आणि निरोगी आयुष्य द्यावे, अशी प्रार्थना मी करतो,’ असे ते म्हणाले. ‘कल खेलमें हम हो ना हो, गर्दिशमें तारे रहेंगे सदा’, असे ते यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुमारे साडेचार वर्षांच्या काळात त्यांनी एक हजार २५० निकाल दिले.
न्या. मुकेशभाई शहा यांचे वडील रसिकभाई हे मोठ्या वकिलाकडे क्लार्क म्हणून कामाला होते. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त करून वकिली करण्यास सुरुवात केली. त्यांनीच त्यांच्या मुलाला वकिली करण्यास प्रोत्साहन दिले. मुकेशभाई यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गुजरात उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या वडिलांनी वकिली करणे सोडून दिले. उच्च न्यायालयात मुकेशभाई यांची उत्तम वकिली सुरू असताना त्यांनी २००४ मध्ये न्यायाधीश होण्याचे आमंत्रण स्वीकारले. ते अवघ्या कमी कालावधीसाठी बिहारचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यानंतर २ नोव्हेंबर, २०१८ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
‘मी नेहमीच माझ्या विवेकाचे पालन केले आहे. मी नेहमीच देव आणि कर्मावर विश्वास ठेवला. कधीही कशाचीही अपेक्षा केली नाही. . . मी नेहमी गीतेचे पालन केले,’ असे ते म्हणाले. करोनाकाळातही ते नियमितपणे सर्वोच्च न्यायालयात येत असत. न्या. शहा आणि न्या. चंद्रचूड या दोघांनीही करोना कार्यकाळात नागरिक व श्रमिकांना होणाऱ्या अडचणींची दखल घेऊन सुनावणी घेतली आणि त्यांना मदत करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांना दिले.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा शायराना अंदाज
सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायाधीश एम आर शहा यांचा सोमवार, १५ मे हा कामाचा शेवटचा दिवस होता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाच्यावतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त न्यायमूर्ती एम आर शाह यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये ३०० हून अधिक बेकायदा मझार जमीनदोस्त
कर्नाटक काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाची शर्यत पोटदुखीने सुरू
समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!
न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा न्यायमूर्ती शहा यांच्या निरोप समारंभात शायराना अंदाज दिसून आला. ‘आंख से दूर सही दिल से कहां जायेगा, जाने वाले तू हमारे याद बहुत आयेगा’ असे उद्गार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शहा यांच्यासाठी काढले.
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनद्वारे (SCBA) आयोजित केलेल्या न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या निरोप समारंभात बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती शाह यांच्या संवेदनशील आणि मुक्त स्वभावाचं कौतुक केलं. न्यायमूर्ती शाह यांना त्यांच्या साहस आणि लढाऊ भावनेसाठी त्यांना ‘टायगर शाह’ असे संबोधले.