सन २०२१ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका अंध फुटबॉलपटूला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंधांच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन राहिलेल्या आणि गोल्डन बूट विजेत्या या तरुणाचे नाव पंकज राणा (२३) असे आहे. पीडीत मुलीने साक्ष फिरवली असली तरी डीएनए चाचणीवरून राणा याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
उत्तरकाशी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. राणा हा सध्या उत्तराखंड अंध फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. राणाच्या डीएनएचे नमुने पीडितेच्या कपड्यांशी आणि योनीतील स्वॅबशी जुळल्याचे न्यायवैद्यक अहवालात आढळून आल्याची माहिती मुलीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
अंध फुटबॉल संघाचे दोनवेळा कर्णधारपद भूषवलेल्या राणाने सन २०१५ ते २०२० या कालावधीत दृष्टीहीन खेळाडूंसाठी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने २०१७मध्ये अखिल भारतीय अंध फुटबॉल स्पर्धेत गोल्डन बूट जिंकला होता.
राणा दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असल्याने या मुलीचे तिच्या गावातून हॉटेलमध्ये अपहरण करून नंतर त्याच्या बहिणीच्या घरी ठेवण्यात त्याला कोणीतरी मदत केली असावी, असे न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावताना नमूद केले. या संदर्भात कोणताही पुरावा सादर केला गेला नाही किंवा तपासला गेला नाही, असे ताशेरे न्यायालयाने मांडले. मात्र पीडित मुलीने जबाब पलटवल्याने तिला न्यायालयाने नुकसानभरपाई नाकारली. मात्र आरोपीची शिक्षा कमी करण्यास नकार दिला.
हे ही वाचा:
पिवळ्या रंगाच्या साडीतील परिणिती आणि काकांनी डिझाईन केलेल्या वेषात राघव
नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!
पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट
कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास
‘पीडित ही स्वत:च्या मर्जीने आरोपीसोबत गेली असावी, असे गृहित धरले तरी घटनेवेळी तिचे वय १७ वर्षे सहा महिने होते. त्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत संशयाचा कोणताही फायदा आरोपीला दिला जाऊ शकत नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. राणा याला ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तर, १० डिसेंबर रोजी त्याला जामीन मिळाला.
३० जुलै २०२१ रोजी पीडित मुलगी चारा आणण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र ती घरी परतली नाही. नंतर, पोलिसांनी ९ ऑगस्ट रोजी राणाच्या विवाहित बहिणीच्या घरातून तिची सुटका केली. दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात, मुलीने घटनाक्रम सांगितला होता. गुन्ह्याच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी, तिला राणाविषयी माहिती मिळाली. तिची मैत्रीण आणि ते फोनवर बोलायचे. ३० जुलै रोजी, तो एका गाडीमधून आला. तेव्हा त्याच्या सोबत ड्रायव्हर होता. तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून तिला खराडी येथे घेऊन गेला. तिथल्या एका हॉटेलमध्ये रात्र घालवल्यानंतर तो तिला त्याच्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. त्रिकाहली येथे त्याने तिच्याशी अनेकवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तिने जबाबात म्हटले होते. परंतु उलटतपासणीदरम्यान या मुलीने जबाब पलटवून आपले अपहरण झाले नव्हते तसेच, त्याने तिच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नव्हते, असे सांगितले.