22 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारणजंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

हे आंदोलन आता कुस्तीगीरांच्या कह्यात राहिलेले नाही.

Google News Follow

Related

सध्या जंतरमंतर येथे कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू आहे. कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या आघाडीच्या कुस्तीगीरांनी हे आंदोलन छेडले आहे. बृजभूषण सिंह यांनी खेळाडूंचे लैंगिक शोषण केले होते, त्यांच्याकडून खेळाडूंना शिव्या दिल्या जातात, त्यांना मारहाण केली जाते असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात हे आंदोलन केल्यानंतर खेळाडूंनी ते स्थगित केले होते पण आता तीन महिन्यांनी पुन्हा खेळाडू आखाड्यात उतरले. मात्र हे आंदोलन आता कुस्तीगीरांच्या कह्यात राहिलेले नाही.

हळूहळू ते आंदोलनजीवींच्या ताब्यात गेले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वड्रा या खेळाडूंना भेटायला जंतर मंतर येथे गेल्या होत्या. तिथे त्यांनी गंभीर चेहऱ्याने खेळाडूंची भेट घेतली आणि टीका मात्र नरेंद्र मोदींवर केली. त्यावरून हे आंदोलन यांना कुठे न्यायचे आहे याचा अंदाज आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही खेळाडूंना पाठिंबा दिला. तेही जंतरमंतरमध्ये अवतरले. खेळाडूंनी आंदोलनस्थळी राजकीय पक्षांना विरोध दर्शविला पण तो तोंडदेखला होता. कारण हे आंदोलनच हळूहळू राजकीय पक्षांनी किंवा विरोधकांनी, एनजीओंनी काबीज करायला सुरुवात केली.

आता तर त्यात शेतकरी आंदोलनाने उडी घेतली आहे. खरे तर त्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही पण राकेश टिकैत यांनी आता खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे कूच केले आहे. त्यांच्यासोबत पुरुष महिला शेतकरीही निघाले आहेत. पिवळ्या ओढण्या घेतलेले, पिवळे फेटे पागोटे घातलेले शेतकरी तिथे पोहोचू लागले आहेत. हे चिन्ह वेगळ्याच आंदोलनाचे आहे.

तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२०मध्ये शेतकरी आंदोलन सुरू झाले होते. त्या शेतकरी आंदोलनात राहुल गांधी यांनी ट्रॅक्टरवर बसून आपला पाठिंबा दर्शविला होता. पण खरे तर त्यांच्या पाठिंब्याच्या आधारेच हे आंदोलन सुरू होते असे दिसत होते. हळूहळू ते आंदोलनही वाढू लागले, फोफावू लागले. त्याचे कारण होते ती, उत्तर प्रदेशची निवडणूक. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नुकसान पोहोचविणे हा त्यामागील उद्देश होता हे लपून राहिलेले नाही. राजकारण म्हणून हे ठीक आहे पण त्याचा उद्देश शेतकरी हित अजिबात नव्हता हे वाईट होते. अखेर शेतकरी कायदे मागे घेतले गेले पण उत्तर प्रदेशात भाजपाचेच सरकार आले. त्याचा या शेतकरी आंदोलनातील नेत्यांना जराही फायदा झाला नाही.

तोच प्रयत्न त्याआधी सीएए आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आला होता. २०१९च्या निवडणुकीत विरोधकांना फायदा मिळेल अशा प्रयत्नातून ते आंदोलन झाले होते. वास्तविक पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांना भारतात शरण मिळावी, येथे नागरिकत्व मिळावे यासाठी हा कायदा करण्यात आला. पण त्यात मुस्लिमांचा उल्लेख नाही म्हणजे ते कायदे भेदभाव करणारे आहेत असा सूर लावत शाहीन बागेत आंदोलक बसले. अनेक महिने रस्ते अडविण्यात आले.

 

हे ही वाचा:

बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

‘इसीस, ब्राइड्स सर्च करा, मग प्रचीती येईल ‘द केरला स्टोरी’ मागच्या वास्तवाची’

‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव

सुवर्ण मंदिराजवळ स्फोट, काचा लागून अनेक भाविक जखमी

 

दिल्लीतील सर्वसामान्य जनतेचा छळ करण्यात आला. त्यात भारतीय मुस्लिमांचा किंवा पाकिस्तानातील मुस्लिमांचा काहीही संबंध नसतानाही आंदोलन रेटण्यात आले. त्याचा उद्देश कायद्यातून कुणावर अन्याय झाला हे दाखविण्याचा अजिबात नव्हता तर केंद्रातील सरकारला तडाखा देण्याचा होता. पण कोरोना आला आणि हे आंदोलन बारगळले. आता २०२४च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी विरोधक हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. त्याचाच पाया रचण्यासाठी या कुस्तीगीरांच्या आंदोलनाचा लाभ उठविला जात आहे.

खरे तर आता कुस्तीगीरांना जे पाठिंबा देत आहेत, त्यातील शेतकरी नेते, स्वरा भास्कर, अरुंधती रॉय यांच्यासारखे कट्टर डावे हे खेळाडूंसाठी अजिबात आलेले नाहीत किंवा त्यांना बृजभूषण यांच्याशीही काही देणघेणे नाही. त्यांचे लक्ष्य आहे ते नरेंद्र मोदी. त्यांना कसे सत्तेवरून खाली खेचता येईल यासाठी कुस्तीगीरांचा खुबीने प्यादे म्हणून उपयोग केला जात आहे. दाखवताना बृजभूषण यांच्या कथित आरोपांवर बोट ठेवले जात आहे पण प्रत्यक्षात लक्ष्य आहेत ते नरेंद्र मोदी. त्यामुळे येत्या काळात जंतरमंतरचे रूपांतर शाहीन बागेत झाल्यास आश्चर्य वाटू नये.  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा