23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयगाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगवारी केल्यानंतर संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यामध्ये पुसट रेषा होती ती नाहिशी झाली आहे.

Google News Follow

Related

शिउबाठाचे खासदार संजय राऊत त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदांतून जे काही करपट ढेकर काढत असतात त्याच्यावर भाजपाने मालवणी मात्रा काढली आहे. राऊतांचे वस्त्रहरण करण्यासाठी भाजपा आमदार नीतेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात राणे यांच्या मालवणी वस्त्रहरणाचे तुफान प्रयोग रंगलेले दिसणार आहेत.

मालवणी माणसात तिरकसपणा आणि ठासून भरलेला उपहास उपजतच असतो. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये ‘अंतु बर्वा’ या पात्राच्या रुपाने हा तिरसकपणा वाचकांनीही अनुभवला आहे. संजय राऊतांना सामोरे जाणे ही काय सामान्य बाब नाही. कारण राऊत वाट्टेल ते बोलू शकतात. खोटं बोलतानाही ते ठाम असतात. ते वडाची साल पिंपळाला चिकटवू शकतात. एखाद्या शेफने शिळ्या भाताचा वेज चायनीज फ्राईड राईस किंवा जीरा राईस करून बेमालूमपणे ग्राहकाच्या माथ्यावर मारावा तसे कौशल्य राऊतांनी साधलेले आहे.

ते जर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला मुखपत्रातून विचारी, सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान ठरवू शकतात. त्यांना पंतप्रधानपदाच्या आभासी शर्यतीत उतरवू शकतात, त्यांच्या घरबशेपणा वलयांकीत करू शकतात, त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सल्लागार बनवू शकतात, त्यांच्या चिरंजीवांना एंग्री यंग मॅन बनवू शकतात तर ते काहीही करू शकतात.   ‘नंगे से खुदा भी डरता है’, असे राऊत म्हणाले होते. नंगा होताना पहिल्यांदाच लाज वाटते, नंतर सवय होते. कारण इभ्रत ही अशी गोष्ट आहे जी फक्त एकदाच गमावता येते. पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात ते शंभर दिवस तुरुंगात मुक्काम करून आल्यावर ते खऱ्या अर्थाने नंगे झाले आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगवारी केल्यानंतर त्यांच्यात आणि नवाब मलिक यांच्यामध्ये एक जी पुसट रेषा होती ती नाहिशी झालेली आहे.

अलिकडे त्यांच्या विधानात हा नंगेपणा, त्यातून निर्माण झालेला खोटारडेपणा आणि नैराश्याचे बेमालूम मिश्रण असते. यातून निर्माण झालेला कोळसा ते रोज उगाळत असतात. हा कोळसा विरोधकांचे तोंड काळे करू शकतो अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे भाजपाला बारसू हत्याकांड करायचे आहे, असे विधान डोके ठिकाणावर असलेला माणूस करू शकत नाही. भाजपाविरोधाचा कंड शमवण्यासाठी जी व्यक्ती कन्हैया कुमारपासून सत्यपाल मलिकपर्यंत कोणाच्याही पालख्या खांद्यावर घेऊ शकते, अशा व्यक्तिशी मुकाबला करणे सोपे नाही. देवेंद्र फडणवीसांपासून नाना पटोलेंपर्यंत सगळे दिवसाआड घनघोर अपमान करतात. तरीही ज्याला फरक पडत नाही, अशा व्यक्तिला रोखणे साधी बाब नाही.

भाजपाने हे शिवधनुष्य नीतेश राणे यांच्याकडे सोपवले आहे. नीतेश राणे हे प्रचंड आक्रमक आहेत. पहिले लाथ, फिर बात, फिर मुलाकात ही त्यांची स्टाईल आहे. दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर टीका करताना नेहमी बचावात्मक पवित्र्यात असतात. ‘आम्ही उद्धवजींचा आदर करतो पण…’ या पालुपदाने त्यांच्या टीकेची सुरूवात होते.   राजकारणात काहीही घडू शकते, उद्या जर राजकारणाचे फासे पलटले तर एक वाट मोकळी असावी, या पलिकडे या सुसंस्कृतपणाला अर्थ नाही. परंतु संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे, अशा लोकांशी मुकाबला करताना ही पद्धत फारशी उपयोगाची नाही. समोरचा जसा आहे, तसेच त्याच्याशी वागायचे असते. ‘जशास तसे’ आणि ‘अरे ला कारे’ हीच खरे तर आदर्श पद्धत. त्यामुळेच संजय राऊतांना हाताळण्यासाठी नीतेश राणे यांची भाजपाकडून अधिकृत नियुक्ती झालेली आहे.

तोंडात तुळशीपत्र ठेवून बोलणे ही राणे स्टाईल नाही. नीतेश यांनी याची झलक दाखवायला सुरूवात केलेली आहे. ‘बारसूमध्ये गोळीबार करण्यासाठी लाठ्या चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मॉरीशसमधून फोन केले’, असा आरोप संजय राऊत यांनी करताच, नीतेश राणेंनी ‘हे आदेश मातोश्रीतून आले होते’, असा प्रतिहल्ला केला. कोणी म्हणेल या उत्तरात लॉजिक कुठे आहे. उद्धव ठाकरे कोण आहेत? ते आदेश कसे देऊ शकतील? परंतु प्रश्नात जर लॉजिक नसेल तर ते उत्तरात तरी कशाला असायला हवे?

पंचतंत्रातील एक गोष्ट आहे. एक गाढव वाघासोबत गप्पा मारत असतो. अचानक गाढवाला आपल्या बुद्धिमत्तेची झलक दाखवण्याची सुरसुरी येते. तो त्याला सांगतो, ‘जंगलात सगळ्यांनाच माहिती आहे, की माझ्यासारखा हुशार कोणीच नाही. तुलाही हे मान्य आहे ना?’ वाघ उत्तर देतो, ‘ तुझं काही तरीच, मला तरी असा काही अनुभव नाही तुझ्याबद्दल!

हे ही वाचा:

मुख्तार अन्सारीला टोळीयुद्ध प्रकरणात १० वर्षांची शिक्षा

१०० कोटी लोकांनी एकदा तरी केले ‘मन की बात’ चे श्रवण

काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या, पण लोक त्या मातीत मिसळतील!

महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला

‘ठीक आहे तुला मान्य नसेल तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे, गवताचा रंग कोणता, ते सांग.’ वाघ म्हणातो, हा काय प्रश्न आहे? गवताचा रंग हिरवा असतो. ‘छ्या काही तरीच काय, गवत निळे असते’, गाढव म्हणतो. दोघांमध्य तुंबळ वाद सुरू होतो. तो इतका वाढतो की प्रकरण जंगलाच्या राजाकडे जाते. सिंह दोघांचे म्हणणे ऐकून घेतो. त्यानंतर गाढवाच्या बाजूने कौल देतो आणि वाघाला शिक्षा सुनावतो. गाढव आनंदाने निघून जाते. तेव्हा वाघ म्हणतो, ‘ हे काय महाराज, गाढव चुकीचे सांगत होते. गवत हिरवेच असते. सिंह हसतो आणि त्याला सांगतो, ‘गवत हिरवेच असते हे मान्य, परंतु तुला शिक्षा मूर्ख गाढवाशी वाद घालण्यासाठी दिलेली आहे.’

हा झाला जंगलाचा न्याय. जंगलात हे शक्यही असते कारण तिथे ना चॅनलचे बूम असतात ना कॅमेरे. परंतु राजकारणात हे निव्वळ अशक्य आहे. नीतेश राणे यांची नियुक्ती याच नाईलाजातून झालेली आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला आलेला विखार संपवण्यासाठी सकाळी ९ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदांना जाणे बंद करा, सगळा विखार आपोआप संपेल असा, सल्ला दिला होता. चॅनलवाल्यांनी तो फार मनावर घेतला नाही. त्यामुळे गाढवाशी वाद घालणे भाग आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा