विले पार्ले येथील नगरसेवक अभिजित सामंत यांनी भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच मनोहर पर्रिकर आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखान्याचा प्रस्तावित आराखडा समोर मांडणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मनोहर पर्रिकर यांच्याविषयी त्यांच्या सहकार्यांनी, निकटवर्तीयांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
अतुल भातखळकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रचारक असल्यापासून आपली मनोहर पर्रिकरांसोबत ओळख असल्याचे सांगितले. त्यावेळी मनोहर पर्रिकर गोव्याचे संघचालक होते, असे देखील ते म्हणाले.
हे ही वाचा:
परमबीर यांची बदली ही ‘रुटीन प्रोसेस’ – संजय राऊत
सर्व दोषी, सहभागींवर योग्य ती कारवाई केली जाईल – हेमंत नगराळे
अतुल भातखळकरांनी मनोहर पर्रिकर यांच्या साधेपणाबद्दल सांगितले. “राजकिय नेता झाल्यानंतर ओळख दाखवायची नाही, तुसडेपणा करायचा असं त्यांनी कधीच केलं नाही. अगदी संरक्षणमंत्री झाल्यानंतरही,माझा फोन ते सहज घ्यायचे, मतदारसंघातले प्रश्न सोडवायला मदत करायचे. मी पहिल्यांदा आमदारकीला उभा राहिलो, तेव्हा स्वतःहून मतदारसंघात येऊन प्रचारसभा घेणे हे त्यांनी केले” असे भातखळकरांनी सांगितले. कार्यकर्ता जपला पाहिजे हा संघविचार पर्रिकरांकडे कायम होता असेही त्यांनी सांगितले. “आरपार प्रामाणिकपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.” असेही ते म्हणाले. “मनोहर पर्रिकर मुंबईत आले की मिलिंद करमरकर यांच्याकडे किंवा गोवा सरकारच्या गेस्ट हाऊसवर उतरायचे आणि जेवायला सर्वासोबत त्या गेस्ट हाऊसच्या कँटिनमध्येच जात असत.”
यावेळी त्यांनी मनोहर पर्रिकरांची हृद्य आठवण देखील सांगितली. ते म्हणाले की “माझ्या मतदार संघातील सीओडीचा प्रश्न त्यांच्यामुळेच सुटला. त्यानंतर कांदिवली येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार देखील केला. तेव्हा आमच्या विभागातले पोलिस अधिकारी गंमतीने म्हणाले, की खरंच संरक्षण मंत्र्याला बोलावलंत की कोणी डमी होता? इतका साधेपणा. संरक्षणमंत्री असूनही कुठलाही ताफा नाही, विशेष सिक्युरिटी नाही; लोकल पोलिसांनी दिली तेवढीच सिक्युरीटी.” या कार्यक्रमानंतर गोव्याला विमानाने जाताना पर्रिकर विमानासाठी बोर्डींग पास घ्यायला सामान्य माणसासारखे लाईनीत उभे होते. अतुल भातखळकर पुढे म्हणतात की, हा नाटकीपणा नव्हता तर हा उरातून आलेला साधेपणा होता.
मनोहर पर्रिकरांकडे विकासाची दृष्टी असल्याने त्यांनी संरक्षणमंत्री असताना अनेक प्रश्न मार्गी लावले. “बुद्धिवान चारित्र्यवान यांच्यासोबतची सहजता त्यांच्याकडे होती. स्वतःमधला कार्यकर्ता जपण्याचे आणि कार्यकर्त्याला जपण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. गोव्यातल्या शेवटच्या घटकाचा विचारही त्यांनी केला. त्यामुळे गोव्याचा प्रमुख उद्योग असणाऱ्या नारळ उद्योगात, नारळाच्या झाडावर चढून नारळ उतरवणाऱ्या माणसाचा इन्श्युरन्स उतरवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतरचा सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री अशी त्यांची नोंद गोव्याच्या इतिहासात होईल.” असे भातखळकरांनी आवर्जून सांगितले. त्याबरोबरच स्वतः कॅन्सरवर न्युयॉर्कला उपचार घेत असताना त्यांना पालघरच्या निवडणुकांची चिंता होती असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विले पार्ले येथील आमदार पराग आळवणी, नगरसेवक अभिजित सामंत, मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय मिलिंद करमरकर आणि दिलिप करंबेळकर हे देखील उपस्थित होते.