अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण बदलले आहे. अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाची बॅनरबाजी सुरु झाली आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन सुट्टीवर गेले आहेत असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी काडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात उत्तर देऊन सगळ्यांची तोंडे बंद केली आहेत. २०२४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू… असे ठाम विधान फडणवीस प्रतिक्रिया देतांना केले आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
२०२४ च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आमचं सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून दाखवू असे जोरदार उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे . फडणवीस यांचे नागपुरात बुटीबोरी येथे बॅनर लागले आहेत. त्यासंदर्भात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांनी कुणी माझे बॅनर लावले असतील, त्यांनी ते बॅनर काढून टाका. अशा प्रकारचा मूर्खपणा भाजपामध्ये तरी करू नका. मला वाटत नाही, बॅनर लावणारा व्यक्ती भाजपाचा असेल, पण काही अतिउत्साही लोक असतात, आपली एखादी बातमी झाली पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे म्हणून अशी बॅनरबाजी करतात.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी
डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?
ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’
भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले
अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर च्या संदर्भात फडणवीस यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. मुख्यमंत्री मुख्यमंत्री होणे ही प्रत्येकाची इच्छा असते पण कधी कधी ती पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपात येणार या चर्चाना काही अर्थ नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर… मावशीला दाढी असती तर… अशा गोष्टीचे उत्तर नसते. त्यामुळे ते भाजपात येणार का यालाही उत्तर नाही असे खोचक उत्तर फडणवीस यांनी दिले.