९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुष्प सन २०२४ मध्ये अमळनेर येथे गुंफले जाणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यात ही घोषणा केली . १९५२ मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनानंतर तब्बल ७२ वर्षांनी हे संमेलन अमळनेरमध्ये होत आहे. साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी महामंडळाने स्थळनिश्चिती समिती गठित केली होती.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सातारा, सांगलीतील औदुंबर, जळगावमधील अमळनेर आणि जालना या चार स्थळांची नावे चर्चेत होती. यातून जळगावची निवड करण्यात आली आणि या बैठकीत जळगावमधील अमळनेरमध्ये संमेलन भरवण्यावर शिक्कामोर्तब झाले. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समिती सदस्यांना व्यतिरिक्त प्रकाश पागे प्रा. मिलिंद जोशी, जे जे कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे आणि प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.
या समितीमध्ये महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे, उपाध्यक्ष रमेश वस्कर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी होते. या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. या तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळ निवड समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या शिफारशीला मान्यता दिली आहे.
हे ही वाचा:
साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप
आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी
वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!
विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !
वर्धा येथे संमेलन पार पडल्यानंतर पुढील संमेलन कुठे होणार याची चर्चा साहित्य वर्तुळात होती. ९७ वे साहित्य संमेलन हे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु आता अंमळनेर या ठिकाणावर महाराष्ट्र साहित्य परिषद महामंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.