पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे शिवसेना नेत्यांसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि दोन शिवसेना नेत्यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. ठाण्यातील एका शिवसेना नेत्याबरोबर सचिन वाझे यांची बांधकाम क्षेत्रात भागीदारी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मुंबई पोलीस दलात एक अधिकारी असून सचिन वाझे यांच्याकडे पाच हजार कोटींची संपत्ती आली कशी? असा घणाघाती सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीयाजवळ स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्याचा आरोप लागल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या संपत्ती वर सवाल उपस्थित केले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी वाझेंवर गंभीर आरोप लावत शिवसेना नेते संजय माशेळकर आणि विजय गवई या दोघांची सचिन वाझेंशी व्यवसायिक भागीदारी असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य
शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?
तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?
पोलीस अधिकारी असून इतकी संपत्ती कशी? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. मात्र २००४ मध्ये ख्वाजा युनूस प्रकरणी निलंबित झाल्यानंतर सचिन वाझे यांनी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काही व्यवसाय सुरू केले. त्यातून सचिन वाझे यांनी किती संपत्ती गोळा केली हे अद्याप कळलेले नाही.
सचिन वाझे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. अटक केल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जर या संदर्भात आर्थिक तपास यंत्रणांनी भविष्यात तपास हाती घेतला तर निश्चितच सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.