केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्याच्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आरोपी जयेश पुजारी याचे पीएफआय आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे संकेत मिळत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी या प्रकरणी दहशतवाद विरोधी कायदा युएपीएचे कलमही जोडले आहे. जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना तुरुंगात असताना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता याप्रकरणी एटीएस पुजारीची चौकशी करू शकते असले पोलिसांनी म्हटले आहे.
जयेश पुजारी उर्फ जयेश कांत यांनी पहिल्यांदा फोन करून नितीन गडकरींकडे १०० कोटींची मागणी केली होती. तर दुसऱ्यांदा त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली होती. सध्या तो नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. जयेश पुजारी २८ मार्चपासून नागपूर पोलिसांच्या कोठडीत आहे. नागपूर पोलिसांनी त्याला बेळगावी कारागृहातून चौकशीसाठी नागपुरात आणले आहे. बेळगावी कारागृहातून जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला होता. नागपूर पोलिसांनी बेळगावी कारागृहातील जयश पुजारीच्या बॅरेकमधून दोन सिम आणि दोन मोबाईल जप्त केले होते.
विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना गेल्या महिन्यात २१ मार्च रोजी दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याआधी १४ जानेवारीला नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. गेल्या वेळी त्यांच्या कार्यालयात जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची चर्चा होती. केंद्रीय मंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर त्यांच्या घराची आणि कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात
दुहेरी दिलासा.. महागाई घटली, औद्योगिक चक्राला मिळाली गती
मेड इन इंडियाच्या बळावर ऍपलची निर्यात ४५ हजार कोटींवर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’
जयेश पुजारी हा कर्नाटकच्या हिडलिंगा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने तुरुंगातूनच धमकीचे फोन केले होते. जयेश पुजारी याला न्यायालयाने एका खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली असल्याचे पोलिसांना तपासाच्या दरम्यान आढळून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी याने आपण दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावाही केला आहे. कारागृहात त्याच्याकडून पोलिसांना एक डायरी सापडली होती, ज्यामध्ये नेते आणि मंत्र्यांचे नंबर होते. पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली असून फोन कुठून आला याचा तपास करत आहेत. गडकरी यांना आलेल्या धमकीच्या कॉलची राज्य सरकार सखोल चौकशी करेल . आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.