लष्करी राजवटीविरोधातील कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांच्या जमावावर म्यानमारच्या लष्कराने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात लहान मुलांसह डझनभर लोकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त लोक मारले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी सर्वसामान्य लोक उपस्थित होते. म्यानमारच्या लष्कराने पाजिगी शहरावर २० मिनिटे सतत विमानातून बॉम्बफेक आणि गोळीबार केला.
पाजिगी शहर सागाइंग प्रांतात आहे. राजधानी नेपीडाव पासून ते २६०किमी अंतरावर आहे. पाजिगी शहरात पीपल्स डिफेन्स फोर्से चे कार्यालय उघडत असताना लष्कराने हा हल्ला केला. पीडीएफ देशात लष्कराच्या विरोधात मोहीम चालवत आहे. हल्ल्याच्या वेळी तेथे ३०० पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारच्या लष्करी नागरिकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे. हा हवाई हल्ला अतिशय अस्वस्थ करणारा आहे.
हेलिकॉप्टरमधून बॉम्ब टाकले तेव्हा अनेक शाळकरी मुले एका हॉलमध्ये नाचत होती. असे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी म्हटले आहे. हवाई हल्ल्यात नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट या लष्करी शासनविरोधी गटाचे कार्यालय उद्ध्वस्त झाले. बॉम्बस्फोटाच्या वेळी महिला आणि लहान मुलांसह १५० पेक्षा जास्त लोक समारंभात सहभागी झाले होते. मृतांमध्ये सशस्त्र गट आणि लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या इतर राजकीय संघटनांच्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती वोल्कर तुर्क यांनी दिली.
हे ही वाचा:
सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!
उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका
मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा सापडला पुण्यात, पोलिसांनी घेतले ताब्यात
अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; आता तारीखही दिली
सत्ता पालटानंतरचा सर्वात मोठा हल्ला
दोन वर्षांपूर्वीच्या सत्तापालटानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला म्हटले जात आहे. सकाळी ७ वाजता लष्कराच्या विमानाने गावावर बॉम्ब टाकला, त्यानंतर अनेक हेलिकॉप्टरमधून गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार सलग २० मिनिटे सुरू होता असे स्थानिकांनी सांगितले. फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारच्या लष्कराने बंड करून देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. तेव्हापासून देशात लष्करी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत आहेत. ही निदर्शने दडपण्यासाठी लष्कर लोकांवर बळाचा वापर करत आहे. लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.