24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरसंपादकीयमविआचे काय होणार? रोहित पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा...’

मविआचे काय होणार? रोहित पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा…’

नेत्यांनी महाविकास आघाडीची माती करायची ठरवली, तर भविष्यही नाही आणि वर्तमानही नाही.

Google News Follow

Related

थोरल्या पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदाणी यांची उघड पाठराखण केल्यानंतर मविआचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. काल परवाच रोहित पवारांनी ट्वीटरवरून ‘आस्क मी एनिथिंग’, हा चर्चात्मक उपक्रम केला होता. त्यात त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकलंय. ‘जर नेत्यांनी ठरवलं तर भविष्य उज्ज्वल आहे.’ परंतु मविआमध्ये जे काही चाललं आहे, ते पाहता नेत्यांनी महाविकास आघाडीचा निकाल लावण्याचे ठरवले आहे, असे चित्र तूर्तास तरी दिसते आहे. भाजपा-शिवसेना युतीची मुहुर्तमेढ हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली होती. महाविकास आघाडी सत्तेसाठी बनली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आकडे जोडले तर बहुमताचा आकडा गाठता येतो, हे लक्षात आल्यानंतर मविआची जुळवाजुळव सुरू झाली. आणि पुढे अडीच वर्ष यशस्वीही झाली. त्यानंतर सरकार कोसळले.

‘राज्यात सत्ता गेल्यानंतर आम्ही पूर्वीपेक्षा घट्टपणे उभे आहोत’, असा दावा शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत केला होता. सभेला उपस्थित लोकांना ते खरंही वाटले आणि त्यांनी टाळ्याही वाजवल्या. २ एप्रिल रोजी ही सभा झाली होती. परंतु एका आठवड्याच्या आत पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या दाव्यातली हवा काढली.

पवारांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मांडलेली मत काँग्रेसने झुरळ झटकावे तशी झटकली. पवारांना अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले. ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, पवारांनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, ती त्यांना लखलाभ असो’, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना फटकारले. समस्त पवार कुटुंब मात्र एकमुखाने हीच भूमिका मांडताना दिसते आहे. अजित पवारांनी अदाणींसोबत पवारांचे फोटो झळकावून पवारांवर जहरी टीका करणाऱ्य काँग्रेस नेत्या अलका लांबा यांचे कान उपटले. ‘डरे हुवे लोग, अपने निजी हितो के कारण तानाशहा हे गुण गा रहे है…’ असा ट्वीट लांबा बाईंनी केला होता. त्यावर अजित पवारांनी तितकीच तिखट प्रतिक्रीया दिली. ‘कोणी ट्वीटरवर निशाणा साधला तर आम्हाला भोकं नाही पडत, फोटो अदाणींसोबत आहे, कोणत्या डॉनसोबत नाही ना?’ असा सवाल विचारला.

अजित पवार थोरल्या पवारांचे समर्थन करत होते आणि थोरले पवार अजित दादांचे. अजित पवारांनी जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबद्दल घेतली होती, तीच भूमिका थोरल्या पवारांनी मांडली आहे. ‘डिग्री हा विरोधाचा मुद्दा असू शकत नाही’, हे विधान करून पवारांनी काँग्रेसच्या जखमांवर पुन्हा मीठ चोळले. अदाणींच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे मीडियाला सांगतायत, आम्ही महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर एकत्र आहोत. शेतकऱ्याच्या, कांदयाच्या प्रश्नावर एकत्र आहोत. परंतु विरोधकांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर बंद पाडण्याचा प्रयत्न केला नव्हता, हे सगळे महाभारत अदाणींच्या मुद्यावरच झाले हे सुप्रिया सुळे यांना कोण सांगणार?

राजकारणात पोपट मेल्यावर पोपट मेला असे अनेकादा सांगता येत नाही. सध्या मविआच्या नेत्यांची स्थिती तशीच झालेली आहे. शरद पवार यांनी अदाणी प्रकरणी मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसने अदाणींच्या विरोधातले हल्ले अधिक धारदार करायला सुरूवात केलेली आहे. पवारांचे चेले शिउबाठाचे नेते-प्रवक्ते संजय राऊत यांचाही तिळपापड झाल्याचे उघड आहे. देशातील अनेक उद्योगपतींना टार्गेट केले जातेय, राजकारण्यांना टारगेट केले जाते आहे. परंतु गौतम अदाणींना मोकळं सोडलं जातेय. या मुद्यावर शरद पवारांनी भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून केलेली आहे.

संजय राऊतांनी मीडियाला जे सांगितले ते त्यांना थेट सांगता आले असते. ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या जितके जवळ नाहीत, तेवढे शरद पवारांच्या जवळ आहेत. तरीही त्यांनी आपली मागणी पवारांना मीडियाच्या माध्यमातून कळवली, हा प्रकार गमतीदार आहे. हे म्हणेज एकाच ऑफीसमध्ये काम करणाऱ्या चपराशाने सुट्टीचा अर्ज करण्यासाठी बॉसला टपाल पाठवल्यासारखे आहे. आता मविआमध्ये असा कलगीतुरा सुरू झाल्यानंतर भाजपा नेते त्यात आणखी आग घालण्याचा प्रयत्न करतील हे उघड आहे. अयोध्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने पवारांबाबत केलेल्या शेलक्या विधानांचा समाचार घेतला आहे.

हे ही वाचा:

एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले

आता गुजरातमध्ये उभी राहतेय भगवान द्वारकाधीशांची १०८ फूट उंचीची मूर्ती

पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला

शिवसेनाभवन, शिवसेनेचा निधी, शाखा एकनाथ शिंदेंना सोपवा!; सर्वोच्च न्यायालयात याचिका

‘शरद पवार हे भारताचे एक ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे घातक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारताची प्रगल्भ राजकीय संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करतायत’, असा टोला लगावला आहे. म्हणजे काही मार्चमध्ये पदवीधर निवडणुकांमध्ये मविआला चांगले यश मिळाल्यानंतर देशात बदलाचे वातावरण तयार होते आहे, हे विधान करणाऱ्या पवारांनी जितक्या सहजपणे पलटी मारली, तितक्याच सहजपणे फडणवीसांनी पवारांची कड घेणारे हे विधान केलेले आहे. आता मविआमध्य इतकी हाणामारी सुरू असताना लोकांना मविआचे भवितव्य काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आस्क मी एनिथिंग या ट्वीटरवर राबवलेल्या चर्चात्मक उपक्रमात नेमका हाच सवाल त्यांना एकाने विचारला.

जर नेत्यांनी ठरवलं तर भविष्य उज्ज्व आहे, असे उत्तर रोहित पवारांनी त्या प्रश्नकर्त्याला दिले. उत्तराचा दुसरा अर्थ असा की नेत्यांनी महाविकास आघाडीची माती करायची ठरवली, तर भविष्यही नाही आणि वर्तमानही नाही. रोहित पवार हे चहा घेत नाहीत, त्यांना ब्लॅक कॉफी आवडते, असेही या चर्चेतून उघड झालंय. त्यांनी समर्थकांसोबत ब्लॅक कॉफी घेता घेता केलेल्या चर्चेत, मविआचे भवितव्य स्पष्ट केले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा