महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी एपीआय सचिन वाझे प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही असे सांगितले. सामान्य विषयांवर चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सचिन वाझे हे ‘स्थानिक’ प्रकरण असल्याचे सांगितले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी आढळल्यापासून महाराष्ट्राने सचिन वाझे हे नाव मोठ्या प्रमाणात ऐकले. मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव पुढे आले आहे. शनिवारी (१३ मार्च) रात्री उशिरा एनआयएने सचिन वझे यांना १३ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. सचिन वाझेंचे अनेक शिवसेना नेत्यांशी व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेशही केला होता. या सर्व प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकी नऊ आणले होते. यानंतर शरद पवारांना मुंबईत येऊन बैठक घ्याव्य लागल्या होत्या. परंतु त्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सचिन वाझे हा स्थानिक विषय असल्याचे सांगितले होते.
हे ही वाचा:
वॅक्सीन गोदामात ठेऊन ठाकरे सरकार करतय लॉकडाऊनचा विचार
खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन
वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?
आमदार अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, राम कदम यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ठेऊन जयंत पाटलांनीही या विषयावर कोणतीही चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाली नसल्याचे सांगितले आहे. वर्ष बंगल्यावर सामान्य प्रशासनिक विषयांवर चर्चा झाल्याचे जयंत पाटलांनी सांगितले आहे.