२०२१ मध्ये भारताच्या मदतीने भूतान सोडणार पहिला उपग्रह!
भारताचा जवळचा मित्र आणि शेजारी राष्ट्र भूतान आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडायला सज्ज झाला आहे. हा उपग्रह सोडण्यासाठी भारत भूतानला मदत करत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येथे हा उपग्रह बनवला जात असून यासाठी भूतानचे चार इंजिनिअर्स भारतात दाखल झाले आहेत.
भूतानच्या इंजिनिअर्सना इस्रोमध्ये प्रशिक्षित केले जात आहे. २८ डिसेंबरला ते २५ फेब्रुवारी पर्यंत यु.आर.राव सॅटेलाईट सेंटरमध्ये हे प्रशिक्षण सुरु आहे. सध्या प्रशिक्षणच्या पहिला टप्पा सुरु असून हे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे.
२०१९ मध्ये मोदींची घोषणा…
ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर असताना त्यांनी पहिल्यांदा उपग्रह सोडण्याविषयीची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये दोन्ही देशाच्या पंतप्रधानांची व्हर्च्युअल मीट झाली तेव्हा मोदींनी २०२१ मध्ये भूतान स्वतःचा उपग्रह सोडणार असल्याची घोषणा केली. भारताने २०१७ पासून आपल्या शेजारी मित्रांसाठी उपग्रह बनवण्याची योजना सुरु केली. ज्यात नेपाळ,भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव या देशांचा समावेश आहे.