पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहुतेक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फॉर्म्युला वापरायचे ठरविले आहे. हुगळीत रामनवमीला झालेल्या दंग्याला जे जबाबदार आहेत, ज्यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.
ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे की, अशा लोकांची संपत्ती जप्त करण्यात येईल आणि त्या संपत्तीचा लिलाव करून ती संपत्ती ज्यांचे नुकसान झाले त्यांना देण्यात येईल. हुगळीत सध्या इंटरनेट सेवा बंद असून मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार
ठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!
ग्रीन रिफायनरी कोकणातच उभी राहणार!
व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल
हुगळीव्यतिरिक्त हावडामध्येही दंगल उसळली होती. पण ममता बॅनर्जी यांनी याला भाजपा जबाबदार आहे असे म्हटले आहे. शिवाय, मुस्लिम लांगुलचालनाची संधीही त्यांनी साधली. हे सगळे दंगे किंवा हल्ले मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या मोहल्ल्याजवळच कसे काय होतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, विधानसभेच्या मागच्या सत्रातच एक विधेयक संमत झाले असून त्यानुसार आता हिंसा करणाऱ्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. त्या संपत्तीचा लिलाव करून त्यातून पीडितांना मदत केली जाईल. पुन्हा एकदा हिंदू सणांवर आक्षेप घेत ममता म्हणाल्या की, रामनवमीच्या आधीच या मिरवणुका का काढल्या जातात.
रामनवमीच्या दिवशी देशभरात विविध ठिकाणी मिरवणुकांवर दगडफेक करण्याच्या घटना घडल्या. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश याठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. शिवाय, पोलिसांसह खासगी गाड्याही जाळण्यात आल्या.