काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी सोमवारी सुरतला आले पण त्यात या शिक्षेविरोधात अपील करण्यापेक्षा शक्तीप्रदर्शन करण्यातच काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना रस असल्याचे दिसले.
राहुल गांधी हे सुरतला ३ एप्रिलला येणार आणि आपल्याला झालेल्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात दाद मागणार याची चर्चा होती. खरेतर त्यांच्या वकिलांनी येऊन ते अपील करण्याची संधी होती पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह देशभरातील अनेक नेते राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी सुरतमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आदि नेत्यांना हजेरी लावली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही तिथे पोहोचले. विमानातून राहुल गांधी यांचे सुरतमध्ये आगमन झाले तेव्हापासून त्यांचा प्रवास कसा असेल त्यांच्यासोबत कोण असतील वगैरेची चर्चा देशभरात रंगली. त्यामुळे राहुल गांधी हे दाद मागण्यासाठी येत आहेत की शक्ती प्रदर्शन करण्यासाठी येत आहेत याची चर्चाही सुरू झाली.
त्यानंतर राहुल गांधी यांना सत्र न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत जामीन मंजूर केला.
हे ही वाचा:
भारतात आहेत १०० वर्षांपेक्षा जुनी २३४ मोठी धरणे
अयोध्येचा ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडॉल १३’चा विजेता
संजय शिरसाट म्हणतात, अशोक चव्हाण भाजपात जातील!
दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?
यासंदर्भात भाजपाने काँग्रेसवर टीका केली. न्यायसंस्थेवर दबाव आणण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन केले जात आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, न्यायसंस्थेवर दबाव आणण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केले जात आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आहोत. जर न्यायालयाने एखाद्याला दोषी धरले आहे तर त्यासाठी असे शक्तिप्रदर्शन करण्याची काय आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाला देशापेक्षा एक कुटुंब मोठे वाटत आहे.
रिजिजू यांनी त्याआधी सकाळी ट्विट केले होते की, राहुल गांधी सुरतमध्ये आपल्या शिक्षेविरोधात दाद मागण्यासाठी येत आहेत. पण तिथे त्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. दोषी व्यक्तीला स्वतः हजर राहण्याची गरज नसते. पण ते वैयक्तिकरित्या हजर राहतानाच सोबत नेत्यांची फौज घेऊन येणार असतील तर ते एक नाटक आहे. हे शक्तिप्रदर्शन करून राहुल गांधी एक बालिश कृत्य करत आहे. न्यायालये अशा प्रकारच्या दबावतंत्राला बळी पडत नसतात, असेही रिजिजू म्हणाले.
राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत जामीन दिला आहे. या शिक्षेविरोधात ते दाद मागण्यासाठी आले त्यात एक अर्ज जामिनासाठी होता तर दुसरा त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी. त्यांना आता १३ एप्रिलपर्यंत जामीन देण्यात आला आहे. याआधी, २३ एप्रिलला त्यांना दंडाधिकाऱ्यांनी सजा सुनावली तेव्हा दाद मागण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला होता.
दुसऱ्या अर्जानुसार त्यांच्या शिक्षेला आव्हान दिले गेले आहे पण त्यासाठी ज्यांनी तक्रार केली त्या पूर्णेश मोदी यांना नोटीस पाठविण्यात आली असून १० एप्रिलपर्यंत त्यांनी आपले उत्तर द्यायचे आहे. ३ मे रोजी या मुद्द्यावर सुनावणी होईल.
ही दाद मागितल्यावर राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ही लोकशाही वाचविण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे अस्त्र आहे आणि तेच माझा आधार आहे.
राहुल गांधी यांनी २०१९मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणात म्हटले होते की, मोदी आडनावाचे सगळेच कसे काय चोर असतात? या विधानावरून पूर्णेश मोदी यांनी हा मोदी समाजाचा अपमान असल्याची तक्रार करत राहुल गांधी यांना न्यायालयात खेचले होते.