मद्यपान केल्यानंतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात किती घोळ घातले जातात याची अनेक उदाहरणे समोर असताना वांगणी स्थानकातील फाटक इन्चार्जच्या बाबतीतही अगदी तेच घडले.
शुक्रवार ३१ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान वांगणी स्थानकातील फाटक इन्चार्ज मद्यपान करून कार्यालयात चक्क डाराडूर झोपलेला होता. तो झोपलेला असल्याने तब्बल एक तास वांगणीतील सीएसएमटी दिशेकडील रेल्वे फाटक बंद राहिले. परिणामी वाहनांचा खोळंबा झाला होता. विशेष म्हणजे रुग्णवाहिका अडकून पडल्याने एकच गोंधळ माजला होता.
वांगणी पूर्व व पश्चिम दिशेला जोडले जाणाऱ्या या फाटकाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
हे ही वाचा:
देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’
अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?
घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला
एक तास झाला तरी रेल्वे फाटक उघडण्यात न आल्याने अखेर संतप्त वाहन चालकांनी फाटक इन्चार्ज यांच्या कार्यालयात धाव घेतली असता. फाटक चालू व बंद करणाराच फाटक इन्चार्ज मद्यपान करून कार्यालयात झोपला असल्याचे लक्षात आले. त्याला उठवून विचारण्यात आले तर आपण दारू प्यायलो नाही असे तो बरळत होता. तो भानावरही नव्हता. आम्ही तासाभरापासून अडकून पडलो आहोत, तुला त्याचे काही वाटते का, असा जाब लोक विचारत होते. तसा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ड्युटी असतांना हा कर्मचारी मद्यपी करून कार्यरत होता. अशा कर्मचाऱ्यांवर रेल्वे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहन चालकांनी वांगणी स्थानक व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.
फाटक बंद होते त्यामुळे प्रवासी अडकून पडले पण फाटक उघडेच राहिले असते तर काय झाले असते अशी भीतीही लोक व्यक्त करत होते.