केंद्र सरकारने २०२३ या वर्षासाठीचे विदेश व्यापार धोरण जाहीर केले आहे. या नवीन विदेश व्यापार धोरणांतर्गत २०३० पर्यन्त २,००० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीकल लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे विदेश व्यापार महासंचालक संतोष सारंगी यांनी म्हटले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याहस्ते परकीय व्यापार धोरण जाहीर २०२३ चे अनावरण करण्यात आले. परकीय व्यापार धोरणाची १ एप्रिल २०२३ पासून अमलबजावणी करण्यात येणार आहे.
याआधीचे धोरण १ एप्रिल २०१५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू झाले होते. पण कोरोना संसर्गामुळे या विदेश व्यापार धोरणात अनेकवेळा वाढ करण्यात आली. या विदेश व्यापार धोरणाला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ३१ मार्च २०२३ अशी शेवटची मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर शुक्रवारी नवीन विदेश व्यापार धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. पारंपारिकदृष्ट्या विदेश व्यापार धोरण पाच वर्षांसाठी जाहीर करण्यात येते. पण या नवीन धोरणाची कालबाह्यता तारीख नाही असे सारंगी यांनी स्पष्ट केले. नव्या विदेश व्यापार धोरणात निर्यात वाढवण्यावर आणि आयात कमी करण्यावर भर असेल. त्यापेक्षा अधिकाधिक परकीय व्यापार डॉलरऐवजी रुपयात व्हावा, याकडेही लक्ष केंद्रित केले जाईल.
भारतीय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांची उपस्थिती वाढवणे यावर नवीन विदेश व्यापार धोरणात भर देण्यात आला आहे. हा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर देशातील वस्तू आणि सेवांची निर्यात वाढवणे, नोकऱ्या वाढवणे आणि स्वावलंबी भारत बनवणे यावर धोरणात लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मालवणी हिंसाचार, २००- ३३० लोकांवर गुन्हा दाखल
प्रशांत कारुळकर यांना नौदलाचे व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्याकडून सन्मानचिन्ह
डासांच्या जळत्या कॉइलने घेतला सहा जणांचा घेतला जीव
पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर, आठ जणांना अटक
निर्यात ७६० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल
देशामध्ये २०२१-२२ या वर्षांमध्ये ६७६ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ही निर्यात ७६० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल असे विदेश व्यापार मंत्रालयाने म्हटले आहे. नवीन धोरणामुळे ई-कॉमर्स निर्यातीलाही चालना मिळेल.२०३० पर्यंत ही निर्यात २०० ते ३०० अब्ज डॉलर्स वर अपेक्षा आहे. भारतीय रुपयाला जागतिक चलन बनवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात देशांतर्गत चलनाला प्रोत्साहन देण्याचे लक्ष्यही विदेश व्यापार धोरणात ठेवण्यात आले आहे.
सेवा आणि कृषी निर्यातही वाढ
२०२१-२२ या आर्थिक वर्षात देशाची शेतमालाची निर्यात २५ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. याच कालावधीत वस्तूंची निर्यात ४२२ अब्ज डॉलर्स आणि सेवा निर्यात २५४ अब्ज डॉलर्स होती. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
रुपयात व्यवसायाचा काय फायदा ?
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारताला रशियाकडून आयात करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळेच नंतर दोन्ही देशांनी रुपया आणि रुबलमध्येच व्यापार सुरू केला. त्याचप्रमाणे इराणच्या संकटाच्या काळातही भारताने रुपयात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. रुपयात व्यवसाय केल्यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यावरील दबाव कमी होईल . त्याच वेळी, भारतीय रुपयाचे मूल्य देखील मजबूत होण्यास मदत होणार आहे.