आकांक्षा, नव जवान, ओम ज्ञानदीप, दादोजी कोंडदेव यांनी ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्ट आयोजित पुरुष द्वितीय श्रेणीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रभादेवी समुद्र किनाऱ्या जवळील मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या सामन्यांचा आजचा दुसरा दिवस. आज पहिल्या सामन्यात आकांक्षा मंडळाने अमर क्रीडा मंडळाचा ४७-२३ असा पाडाव केला. स्वप्नील पाटील, सवर्जित राम यांच्या आक्रमक चढाया त्याला तेजस यादवने भक्कम बचावाचा खेळ करीत दिलेली साथ यामुळे विश्रांतीला २३-१४ अशी आघाडी घेणाऱ्या आकांक्षाने सामना सहज आपल्याकडे झुकविला. अमरकडून दीपेश घुलप, रोहन मोहिते यांनी थोडाफार प्रतिकार केला.
दुसऱ्या सामन्यात नवजवान संघाने चुरशीच्या लढतीत कासारवाडी वेल्फेअरला ३८-२९ असे नमविले. मध्यांतराला १६-१२ अशी नवजवान संघाकडे आघाडी होती. शुभम काळे, श्रेयस मांडवकर, नरेश कदम नवजवानकडून, तर यश तांबे, आकाश घाडीगांवकर कासारवाडीकडून उत्कृष्ट खेळले. ओम ज्ञानदीपने प्रतिज्ञा मंडळावर २९-२२ अशी मात केली. पूर्वार्धात १४-०८ अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानदीपला उत्तरार्धात प्रतिज्ञाने कडवी लढत दिली. त्यामुळे काही चांगले झटापटीचे क्षण पहावयास मिळाले. राकेश परब, तनिष कारेकर ओम ज्ञानदीपकडून, तर निखिल पटेल, रोहन मोहिते प्रतिज्ञाकडून उत्तम खेळ केला.
हे ही वाचा:
शेवटचा सामना एकतर्फी झाला. त्यात दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सने गुणांचे अर्धशतक पार करीत सर्वोत्कर्षचा ५२-२७ असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात २७-११ अशी आघाडी घेणाऱ्या कोंडदेवने दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम ठेवत आपला विजय सोपा केला. शुभम साळुंके, प्रशांत पाटील, गणेश धराल यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सर्वोत्कर्षच्या गणेश पार्टे, योगेश राणे यांचा प्रतिकार आज अगदीच दुबळा ठरला.