अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो अर्थात एनसीबीचे अधिकारी बनून राज्यभर वसुली करीत सुटलेल्या ४ जणांच्या टोळीला अकोला जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.या टोळीजवळून लालबत्ती लावलेले वाहन, एनसीबीचे बोगस ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी एनसीबीने केली असून या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीम शाह महेबूब शाह (३०), एजाज शाह रहमान शाह (२४), मोहसिन शाह मेहमूद शाह (२३), असिक शाह बशीर शाह (२८) असे अटक करण्यात आलेल्या तोतया एनसीबी अधिकारी यांची नावे आहेत. हे चौघे अकोला जिल्ह्यात राहणारे आहेत. अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून चार जणांची टोळी फिरत असल्याची माहिती अकोला येथील दहीहंडा पोलीसाना मिळाली होती.गुरुवारी दहीहंडा पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे कसून चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची अनेक बनावट कागदपत्रे, शिक्के, व्हिजिटिंग कार्ड आदी आढळून आले.
अटक करण्यात आलेला नदीम शाह महेबूब शाह हा एनसीबी अधिकारी बनून फिरत होता तर इतर तिघे त्याला सहकार्य करीत होते.
हे ही वाचा:
परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई
राहुल गांधींनी पुन्हा तेच आरोप उगाळले
ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित
केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
पोलिसांनी एक कार (हुंडाई इऑन) या टोळीजवळून ताब्यात घेतली आहे. या कारला लालबती(अंबर दिवा), नंबरप्लेट जवळ “भारत सरकारचे उप संचालक NCB” असा लोगो तयार करण्यात आला होता. आरोपी नदीम शाह हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाचा अधिकारी म्हणून काम करत होता, दहीहंडा पोलिसांनी याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार, एनसीबीचे अधिकारी अकोला येथे गेले आणि त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्यावर असे लक्षात आले की, नदीम शाह दिवाण ही व्यक्ती २०१९ बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचा खोटा दावा करत होता आणि पुढे नॅकोटिक्स कंट्रोल ब्युरो, आर के पुरम नवी दिल्ली म्हणून रुजू झाल्याचा दावा करत होता.
त्याला एनसीबीच्या उप झोनल डायरेक्टर पदावर बढती मिळाली असल्याचा तो दावा करीत होता, त्याच्याकडे बनावट व्हिजिटिंग कार्ड, लेटर पॅड,शिक्के इत्यादी मिळून आले. एनसीबी अधिका-यांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. हे चौघेही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून परिसरात फिरत होते. त्यांनी दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाचे अधिकारी म्हणून बोर्ड लावला आणि चारचाकी वाहनावर अंबर दिवाही लावला. गुटख्याच्या अनेक दुकानांना भेटी देऊन पाहणी करून कारवाईची धमकी देऊन पैसे उकळले असल्याची माहिती समोर येत आहे याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एनसीबीचे संचालक अशोक घावटे यांनी दिली आहे.