26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयरामदास कदम वाट कसली पाहताय, उडवून द्या बार!

रामदास कदम वाट कसली पाहताय, उडवून द्या बार!

रामदास कदम एकदा द्याच उडवून बार, लोकांनाही कळू दे कि २५ वर्षांच्या महापालिकेतील सत्तेने आणि अडीच वर्षांच्या महापालिकेच्या सत्तेने किती बरकत दिली.

Google News Follow

Related

खेडमध्ये शिवसेनेची जबरदस्त उत्तर सभा झाली. शिऊबाठाची सभा ज्या गोळीबार मैदानात झाली होती, त्याच मैदानात आधीच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी या उत्तर सभेला जमली होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा ललकारले. ‘कुणाच्या प्रॉपर्टी लंडनला आहेत, सिंगापूरला आहेत, श्रीलंका आणि अमेरीकेत कोणाची प्रॉपर्टी आहे, ही माहीती महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा रामदास कदम उघड केल्याशिवाय राहणार नाही’, असा दम त्यांनी भरला.

शिवसेना आणि शिउबाठामध्ये आता निकराची लढाई सुरू झालेली आहे. उत्तम सेनापती अशा लढाईत सुलतानढवा करतो. सुलतानढवा म्हणजे सगळी ताकद एकवटून केलेला निकराचा हल्ला. असा हल्ला ज्यामुळे लढाईचे पारडे फिरू शकेल. कर्णाकडे दोन अमोघ शक्ती होत्या, त्याचा वापर तो निर्णायक युद्धात अर्जुनाच्याविरुद्ध करणार होता. असेच निर्णायक युद्ध महाराष्ट्रात सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या या लढाईत सुलतानढवा करण्याची वेळ आलेली आहे. तरीही शिवसेनेचे पदाधिकारी, एक दिवस यँव करेन आणि त्याँव करेन अशा प्रकारची भाषा करतायत.

उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेनंतर रामदास कदम यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते उद्धव ठाकरे यांच्या चड्डीपर्यंत घसरले. खरे तर सार्वजनिक जीवनात अशी भाषा कोणी वापरू नये. कारण त्याचे सर्व हक्क महाराष्ट्रापुरते तरी संजय राऊतांना बहाल करण्यात आले आहेत. कमरेखालच्या भाषेचा सर्व कोटा तेच पुरा करतायत. परंतु तरीही कदम या पत्रकार परिषदेत राऊत शैलीत बोलले. ते म्हणाले, ‘नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा उद्धव यांची चड्डी पिवळी झाली होती. त्या काळात ते मला घेतल्याशिवाय कुठे बाहेर पडत नसत’. आता एकदा तुम्ही कोणाच्या तरी चड्डीपर्यंत गेलात तर पुढे उरते काय?

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक

नववर्षाच्या शुभेच्छा, आला गुढी पाडवा!

वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीत जाते आहे म्हणत विरोधकांची रडारड

फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न

ही अशी पिवळी भाषा वापरल्यानंतर ‘एक दिवस मी ही माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केल्याशिवाय राहणार नाही’, असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? रामदास कदम एकदा द्याच उडवून बार, लोकांनाही कळू दे कि २५ वर्षांच्या महापालिकेतील सत्तेने आणि अडीच वर्षांच्या महापालिकेच्या सत्तेने किती बरकत दिली. कोणाचे परदेशात मॉल आहेत, ह़ॉटेल, पेण्ट हाऊस आणि इमारती आहेत, हे सगळं जनतेला कळलं पाहिजे. लोकांना फक्त मातोश्री-२ माहिती आहे. त्यामुळे ही छुपी माहिती लोकांसमोर आज उघड होणार नसेल तर कधी होणार?

काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर खात्याची कारवाई झाली होती. तेव्हा महापालिकेतील सगळ्या मोठा दलाल बिमल अगरवाल याची चर्चा झाली. हा अगरवाल स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचा मुलगा यतीन याचा पार्टनर असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या अगरवालने दुबई आणि लंडनमध्ये अनेक मालमत्ता बनवल्या आहेत. ज्या नेत्यांच्या कृपेने अगरवालने हा माल बनवला त्यांनी इथे मालमत्ता बनवल्या नसतील यावर कोणी विश्वास ठेवू शकतो काय?

यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या आयकर विभागाच्या कारवाईत जी डायरी मिळाली, त्यात बरेच तपशील अजून उघड झालेले नाहीत. मातोश्रीला त्यांनी घड्याळ आणि रोकडी शिवाय काय काय वाहिले, याची माहीती अजून बाहेर आलेली नाही. ठाकरेंच्या मालमत्तेबाबत गौरी भिडे यांची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली. याचिकादारांने फक्त आरोपांची राळ उडवली, पुरावा मात्र एकही दिला नाही, असे ताशेर न्यायमूर्तिंनी ओढले. रामदास कदम यांनी किमान गौरी भिडे यांना तरी मदत करायला हवी होती.

देशाबाहेरील गुन्हेगारांची, दहशतवाद्यांची इत्यंभूत माहीती असलेल्या भारतीय गुप्तचर यंत्रणांना भ्रष्ट राजकारण्यांच्या मालमत्तांची माहिती नसेल, असे मानणे खुळेपणाचे आहे. परंतु या यंत्रणा आमच्याकडे माहिती आहे, ती एक दिवस जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे सुके दावे कधीही करत नसतात. जेव्हा हा मसाला त्यांना वापरायचा असतो तेव्हा त्या त्या यंत्रणांकडून या माहितीचा वापर केला जातो. त्यांच्यावर तोंड बंद ठेवण्याचे सरकारी बंधन असते. ज्यांना दिली पाहिजे तिथेच या यंत्रणा माहिती देतात. परंतु रामदास कदमांवर असे कोणतेच बंधन नसताना रामदास कदम कोणत्या मुहुर्ताची वाट पाहातायत. ज्या दिवशी ते ही माहिती उघड करणार तो दिवस येणार तरी कधी?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा