फरार इस्लामी कट्टरतावादी नेता झाकीर नाईक हा मलेशियात स्वस्थ बसला नसून त्याच्या भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. मलेशियातील एका रोहिंग्या दहशतवादी समुहातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहेत.
झाकीर नाईक आणि रोहिंग्या नेता मोहम्मद नासीर यांच्यात २ लाख डॉलरचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या व्यवहारातील काही रक्कम चेन्नईतील एका संशयित हवाला डिलरला देण्यात आल्याचाही खुलासा झाला आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, महिला दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतातील काही महत्वाची संवेदनशील आस्थापने लक्ष्य करण्याचा कट रचला असून म्यानमारमध्ये त्यांना या घातपातासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.
रॉ आणि आयबीच्या हाती ही माहीती आल्यानंतर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगर ही हल्ल्याची संभाव्य ठिकाणे असू शकतात. डिसेंबर महिन्यात हे अतिरेकी बांग्लादेश मार्गे भारतात घुसण्याची शक्यता आहे. भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेतील काही घटक या दहशतवाद्यांना मदत पुरवतील असा होरा गुप्तचर यंत्रणांतर्फे व्यक्त केला गेला.