गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही १५ हजार ६०२ रुग्ण सापडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचीही कडक अंमलबजावणी केली जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्याची भीती सगळ्यांनाच सतावतेय, त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी आर्ज चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.
“कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून, आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे.
हे ही वाचा:
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी
“गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे चार महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धमकावले आहे. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.