लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना हटवून रावनीत सिंग बिट्टू यांना लोकसभेतील नेतेपद देण्यात आले आहे. अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे बंगालच्या मुर्शिदाबादमधून निवडून येणारे खासदार आहेत. याशिवाय ते काँग्रेस पक्षाचे बंगालचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळे चौधरी यांना बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी वेळ देता यावा म्हणून लोकसभेतील नेते पदापासून दूर करण्यात आले आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही केवळ ५२ खासदार निवडून आल्याने, काँग्रेस पक्षाला सलग दुसऱ्यांदा लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचा मान मिळाला नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी सदनाच्या दहा टक्के म्हणजे ५४ पेक्षा जास्त खासदार असणे आवश्यक असते. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा केवळ गटनेते पदावर समाधान मानावे लागले होते. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतील काँग्रेसचे गटनेतेपद दिले होते.
हे ही वाचा:
एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर
कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममतांच्या अडचणीत वाढ
आता बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच पंजाबमधील शेतकरी आंदोलन आणि २०२२ मध्ये पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अधीर रंजन चौधरी यांच्याजागी रवनीत सिंग बिट्टू यांना लोकसभेतील गटनेते पदी नियुक्त करण्यात आले आहे.
रावनीत सिंग बिट्टू हे सलग तिसऱ्यांदा लुधियानामधून लोकसभेत निवडून आले आहेत. तसेच सध्याचे काँग्रेसमधील लोकसभेत निवडून आलेले वक्ते आणि अधीर रंजन चौधरी यांच्या तुलनेत बिट्टू चांगलं भाषण करतात असे मानले जाते. या सर्व कारणांमुळे ही नवीन नियुक्ती केली असल्याचे समजते.
रावनीत सिंग बिट्टू हे शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांना भेटायला गेले असताना, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला होता. शेतकऱ्यांमध्ये अनेक खलिस्तानी घुसले आहेत अशी स्पष्टोक्ती स्वतः बिट्टू यांनीच दिली होती.