नाट्यसमीक्षक म्हणून तब्बल एक दोन नव्हे तर पाच दशके शेकडो नाटकांची समीक्षा करणारे जेष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन झाले आहे. कमलाकर नाडकर्णी हे उत्तम टीकाकार याचे एक उत्तम उदाहरण होते. नाटकाची समीक्षा लिहिण्यांत त्यांचा कुणीच हात धरू शकत नव्हते. आज वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील दोन ते तीन महिने ते आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे.
ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कमलाकर नाडकर्णी यांनी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहायला सुरवात केली. त्यानंतर राजा छत्रपती, महानगरी नाटक, नाटकी नाटक हि पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सुरवातीच्या काळांत सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत ते लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून काम करत होते. त्यांची लेखनशैली ओघवती आणि नाटक बघितल्यावर त्यातले बारीक सारीक बारकावे लक्षात ठेवून कलाकार आणि दिग्दर्शक यांच्या चुकांवर नेमके बोट ठेऊन आपल्या लेखनशैलीत ते मांडत असत. एखाद्या नाटकाचा प्रयोग रंगला तर तो का व कशाप्रकारे याचे विस्तृत विश्लेषण ते करत असत.
हे ही वाचा:
सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’
तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने
मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले
कमलाकर नाडकर्णी यांचे नाटकावर विशेष प्रेम होते हे त्यांच्या कामांमधून दिसत असे. एक चांगला समीक्षक म्हणून त्यांचे योगदान खूपच मोठे आहे. नाडकर्णी हे जरी एक नाट्यसमीक्षक म्हणून त्यांची ओळख असली तरी ते एक चांगले लेखक, अभिनेते,आणि नाट्यदिग्दर्शक, अशा सर्वच भूमिका जगले. बालरंगभूमीपासून सुरवात करत संगत, अपत्य, पस्तीस तेरा नव्वद , क काळोखातला, रात्र थोडी सोंगे फार, चंद्र नभीचा ढळला, अशा अनेक नाटकांसाठी त्यांनी कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
नाडकर्णी यांचा एक वाचक वर्ग होता ज्यामुळे त्याच्या लिखाणानंतर प्रेक्षक नाटक बघायचे कि नाही हे ठरवत असत. त्यांनी काही इंग्रजी नाटकांचा मराठी अनुवाद सुद्धा केला होता. याशिवाय नाट्यप्रशिक्षणमध्ये पण त्यांचा सहभाग होता. ‘नांदी’ नावाच्या देविदास तेलंग यांच्या पाक्षिकात त्यांनी नाट्यपरीक्षणे लिहायला सुरवात केली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात नाट्य समीक्षण लिहिण्यास सुरवात केली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना २०१९ साली जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.