पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले यशवंत सिन्हा हे आता तृणमूलवासी झाले आहेत. बंगाल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिन्हा यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. याच अस्वस्थतेतून त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात मोर्चा उघडला होता. २०१८ साली सिन्हा यांनी भाजपाला राम राम ठोकला.
शनिवारी दुपारी यशवंत सिन्हा यांनी कलकत्ता येथे तृणमूल पक्षात प्रवेश केला. ‘तृणमूल भवन’ या पक्ष कार्यालयात डेरेक ओब्रायन, सुदीप बंडोपाध्याय आणि सुब्रता मुखर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलच्या झेंडा हाती घेतला. “देश आज अशा परिस्थितून जात आहे जी यापूर्वी कधीही नव्हती. लोकशाहीची ताकद ही लोकशाहीच्या संस्थांमध्ये असते. आज न्यायव्यवस्थेसहीत या सगळ्या संस्था कमकुवत झाल्या आहेत.” असे सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यावर सांगितले.
हे ही वाचा:
जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे
एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर
सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी
शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये
“ममता बॅनर्जी आणि मी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये सहकारी होतो. ममता बॅनर्जी या तेव्हाही योद्ध्या होत्या आणि आजही त्या योद्ध्या आहेत. जेव्हा दहशतवाद्यांनी भारताचे विमान कंदाहार येथे हायजॅक केले होते तेव्हा ममता दीदींनी भारतीय नागरिकांच्या बदल्यात स्वतः दहशतवाद्यांना ओलीस जाण्याची तयारी दाखवली होती.” असे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.
तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सिन्हा हे २०१४ पासून विरोधकांच्या सुरात सूर मिसळत मोदी सरकारचे निर्णय आणि धोरणे यांवर सातत्याने टीका करत आले आहेत. २०१८ साली भाजपा सोडताना सिन्हा यांनी पक्षातील आणि देशातील लोकशाहीची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले होते.