देशातील प्रवासी वाहनांनी दणदणीत विक्री केली आहे. देशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे २.९२ लाख प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(सियाम) या संस्थेने म्हटलं आहे.
कार आणि युटिलिटी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे फेब्रुवारीमध्ये एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे सियामने म्हटले आहे. गेल्या महिन्यात वाहन कंपन्यांनी २,९१,९२८ वाहनांचे वितरण केले.
हे ही वाचा:
“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक
साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच
तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते
…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!
मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये वितरित झालेल्या २,६२,९८४ वाहनांपेक्षा हे प्रमाण ११ टक्के जास्त आहे.
प्रवासी कारची विक्री फेब्रुवारीमध्ये १,४२,२०१ युनिट्सपर्यंत वाढली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत १,३३,५७२ वाहनांची विक्री झाली होती. एसयूव्हीसह युटिलिटी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात १,२०,१२२ युनिट्सवरून १,३८,२३८ युनिट्सपर्यंत वाढली आहे.
मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यात १,०२,५६५ वाहनांचे वितरण केले. हे फेब्रुवारी २०२२ च्या ९९,३९८ वाहनांपेक्षा ३ टक्के अधिक आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने गेल्या महिन्यात २४,४९३ वाहनांची विक्री केली. कंपनीने वर्षभरापूर्वी याच महिन्यात २१,५०१ वाहनांची विक्री केली होती.
दुचाकी, तीन चाकींचा वेग वाढला
या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुचाकींच्या विक्रीतही दणदणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये १०,५०,०७९ दुचाकींची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात ११,२९,६६१ दुचाकी विकल्या गेल्या. विक्रीमध्ये तब्बल ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोटारसायकल विक्रीही गेल्या महिन्यात ६,५८,००९ युनिट्सवरून वाढून ७,०३,२६१ युनिट्सवर गेली आहे. स्कूटरची विक्री ३,५६,२२२ युनिट्सवरून ३,९१,०५४ युनिट्सपर्यंत वाढली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री ८६ टक्क्यांनी वाढून ५०,३८२ वर गेली आहे .
अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम
फेब्रुवारीमध्ये प्रवासी वाहनांची झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. वाहन बाजारात सकारात्मक वातावरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ग्राहकांसाठी केलेल्या उत्साहवर्धक घोषणांमुळेही बाजारात उत्साह निर्माण झाला असल्याचं सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी म्हटलं आहे.