झीरो कोविड धोरणामुळे टीकेचे धनी बनलेले आणि अनेक चिनी नागरिकांचा मृत्युस कारणीभूत ठरल्याच्या आरोपांमुळे लक्ष्य ठरलेले झी जिनपिंग हे पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडेच पाच वर्षांसाठी अध्यक्षपद सोपविण्यात आल्यानंतर झी जिनपिंग यांच्या हातातील बाहुले बनलेल्या संसदेने त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे.
झी जिनपिंग यांचे सहकारी लि कियांग यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शुक्रवारी ही निवड निश्चित झाली. बहुमताने जिनपिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावरून शक्तिपीठ महामार्गाकडे
किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’
बीजिंगमधील तियानमेन चौकात असलेल्या पक्षाच्या भव्य वास्तूत ही निवड जाहीर करण्यात आली. सगळी २९५२ मते ही जिनपिंग यांच्याच पारड्यात पडली. त्यानंतर निष्ठा आणि एकजुटीची शपथ घेण्यात आली. झी जिनपिंग यांनी उजव्या पंजाची मूठ उंचावून आपल्या निवडीचे स्वागत केले. चीनी प्रजासत्ताकाशी आपण निष्ठावान राहू अशी शपथ त्यांनी घेतली. या निवडीनंतर प्रगतीपथावरील, लोकशाही मार्गावरील आणि आधुनिक देश घडविण्याचे वचन त्यांनी दिले. पुन्हा एकदा त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यामुळे ते सर्वाधिक काळ चीनचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले व्यक्ती ठरणार आहेत.
खरे तर २०१८मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. त्यांच्या घटनेनुसार तेवढी मुदत त्यांनी पूर्ण केली होती पण त्या नियमांना केराची टोपली दाखवत जिनपिंग यांनी आपली निवड करून घेतली आहे.