वादग्रस्त गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर आता त्याचे वडील बलकौर सिंग यांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत पण पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या पत्नीला मोठी सुरक्षा पुरविणारे मुख्यमंत्री आमच्यासाठी काहीही करत नाही, अशी तक्रार बलकौर सिंग यांनी केली आहे. सध्या ते काँग्रेसच्या नेत्यांसह पंजाब विधानसभेच्या बाहेर बसून आंदोलन करत आहेत.
बलकौर सिंग म्हणाले की, गेले १० महिने आपण पंजाब पोलिसांनी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली पण माझ्या मुलाच्या खुनासंदर्भात कोणताही तपास होत नाही. माझ्या बाजूने काहीही होताना दिसत नाही. जोपर्यंत पंजाबमधील विधिमंडळाचे अधिवेशन होते आहे तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे. कारण कोणताही तपास होत नाही.
बलकौर यांनी म्हटले आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नीसाठी मात्र ४० जणांची सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. जर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम स्थितीत आहे तर भगवंत मान यांच्या पत्नीसाठी ४० जणांची सुरक्षा व्यवस्था कशासाठी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”
‘पर्यावरणपूरक’ रंग वापरून होळी साजरी करा
औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?
माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरी एसीबीची छापेमारी
फेब्रुवारी महिन्यात मान यांच्या पत्नीसाठी ही तगडी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे वृत्त होते.गेल्या आठवड्यात बलकौर सिंग यांना इमेलच्या माध्यमातून धमक्या आलेल्या आहेत. हे इमेल जोधपूर, राजस्थानमधून आल्याचे कळते.
२९ मे २०२२ला सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या गाडीला अडवून गोळीबार करण्यात आला होता. त्याआधी, त्याची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती. त्याचा फायदा उठवून ही हत्या केली गेली. त्यानंतर ज्या मनदीप सिंग आणि मनमोहन सिंग यांना पकडण्यात आले होते त्यांची तुरुंगात हत्या केली गेली. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांची नावेही मुसेवाला हत्याकांडात घेतली गेली आहेत.