बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या बंगल्याच्या भिंत चढून बंगल्याच्या आत शिरलेल्या दोन व्यक्तींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. दोघे स्वतःला शाहरुख खान याचे चाहते असल्याचे सांगत असून शाहरुखला भेटण्यासाठी गुजरात वरून आलो असल्याचे दोघे सांगत आहेत.
वांद्रे पोलिसानी प्राथमिक चौकशीवरून या दोघांविरुद्ध बेकायदेशीररित्या आत शिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचे बंगल्यात भिंतीवरून आत येण्याचे नेमके कारण काय होते याबाबत दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी दोन अनोळखी इसम सुपरस्टार शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या पाठीमागच्या भिंतीवर चढून दोघांनी बंगल्यात प्रवेश केला होता. या दोघांना बंगल्यात फिरत असतांना सुरक्षा रक्षकांनी बघितले असता दोघे पळून जाण्याचा प्रयत्नात असताना या दोघांना सुरक्षा रक्षकांनी पकडून वांद्रे पोलिसांना कळवले.
हे ही वाचा:
दहशतवाद विरोधी कारवायांसाठी मिळणार कठीण कवच
कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?
इटलीलाही वाटते, रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीत नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावतील!
वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी येऊन या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता ‘आम्ही शाहरुख खानचे चाहते असल्याचे त्यांनी पोलिसाना सांगितले. हे दोघे गुजरात राज्यातून शाहरुख च्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मन्नत बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा बघून हे दोघे बंगल्यात जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधत बंगल्याच्या पाठीमागे आले व त्यांनी भिंतीवर चढून बंगल्यात बेकायदेशीररित्या प्रवेश मिळवला होता अशी माहिती या दोघांनी पोलिसांना दिली.
दरम्यान या दोघे सांगत असल्याची माहिती खरी आहे का या दोघांचा बंगल्यात घुसण्याचा उद्देश नेमका काय होता याबाबत पोलीस तपास करीत आहे. दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासवरून सुरक्षा रक्षकाची फिर्याद दाखल करून या दोघांविरुद्ध बेकायदेशीररित्या दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.