23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयलंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?

लंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?

Google News Follow

Related

लंडनमध्ये गेल्या वर्षी एक गोपनीय बैठक झाली. भारतातील विरोधी पक्षातील काही नेते, बँकर, अनिवासी भारतीय, विदेशी दूतावासातील काही लोक या बैठकीत सहभागी झाले होते. याच बैठकीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अस्थिर करण्याबाबत खल झाला. गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहाला दणका देण्यासाठी हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मला सुपारी देण्याचा निर्णय ही याच बैठकीत झाला.

अर्थिक घडामोडींवर भाष्य करणारे वरीष्ठ पत्रकार शांतनू गुहा रॉय यांनी द संडे गार्डीयन या वर्तमानपत्रात लिहीलेल्या लेखात हा धक्कादायक तपशील मांडला आहे. काही दिवसांपूर्वी जॉर्ज सोरोस या हंगेरीयन अमेरीकन उद्योगपतीने म्युनिक सेक्युरीटी कॉन्फरन्समध्ये जेव्हा अदाणी समुहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तेव्हाच हिंडेनबर्ग प्रकरणात परकीय शक्तींचा हात असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले होते.

अदाणी प्रकरणामुळे भारताच्या राजकारणावर असलेली पंतप्रधान मोदी यांची पकड सैल होईल आणि भारतात लोकशाहीचे पुनरुज्जीवन होईल असा दावा सोरोस यांनी केला होता. सोरोस यांच्या वक्तव्याची भाजपाच्या नेत्यांनी गंभीर दखल घेतली होती. सोरोस यांनी मोदी सरकार उलथवण्यासाठी एक अब्ज ड़ॉलर्सची गुंतवणूक केली असून त्यांना भारतात त्यांचे पपलू सरकार हवे आहे, असे सरकार जे त्यांच्या इशाऱ्यावर नाचू शकेल, असा आरोप भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केला होता.  मोदींचा उल्लेख हुकूमशहा असा केला होता.

शांतनू गुहा रॉय यांनी त्यांच्या लेखात नेमके हेच मांडले आहे. हिंडेंनबर्गचा अहवाल हा भारतातील काही लोकांनी तयार केला. ही माणसं नेमण्याचे, त्यांना अहवालासाठी आर्थिक रसद पुरवण्याचे काम काम सोरोस यांनी केले. गुहा यांनी त्यांच्या लेखात मांडलेली आंतरराष्ट्रीय कटाची शक्यता यापूर्वी अनेकांनी मांडली आहे. शस्त्रांच्या बाजारपेठेत दमदारपणे उतरणाऱ्या अदाणींचा काटा काढण्यासाठी हा कट शिजला असावा असे अनेकांना वाटते, परंतु एक पत्रकार जेव्हा ही थिअरी मांडतो तेव्हा माहीतीचे काही पुरावे समोर मांडावे अशी अपेक्षा असते.

हे ही वाचा:

कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

देशभरात गाजत असलेल्या उमेश पाल हत्येचा कट ‘मुस्लिम होस्टेल’मध्ये शिजला…

लंडनमध्ये जर अशा प्रकारची बैठक झाली असेल तर ही माहिती फक्त दोन सोर्समधून मिळू शकते. एक तर बैठकीत सहभागी झालेल्या लोकांपैकी कोणी तरी ही माहीती पुरवू शकतो किंवा भारतीय गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून ही माहिती उघड होऊ शकते. परंतु हे दोन्ही सोर्स गाठणे अवघड आहे.

सोरोस यांच्या वक्तव्यामुळे अदाणी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे, असे मानायला एक ठोस कारण मिळाले आहे. परंतु सोरोस हेच या कटाचे सूत्रधार आहेत, हे सांगणे मात्र धाडसाचे होईल. भारताने कोरोनाची लस निर्माण केली. त्यामुळे भारतातील अतिप्रचंड बाजारपेठेत विदेशी फार्मा कंपन्यांना शिरता आले नाही. जगातील १२० देशांना ही लस पुरवून भारताने तिथल्या बाजारपेठेतही ही पाचर मारून ठेवली. लसीच्या दुष्परिणामांची जबाबदारी न घेता भारतात शिरकाव करण्याचा प्रय़त्न करणाऱ्या फायजर या अमेरिकी कंपनीसमोर मान तुकवणे भारताना नाकारले.

त्यामुळे भारतावर फार्मा कंपन्यांचा खुन्नस आहेच. त्यात अदाणी आता ज्या वेगाने शस्त्रनिर्मितीत पावलं टाकतायत, त्यामुळे शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही अस्वस्थ आहेत. त्यामुळे सोरोस यांना मोहरा बनवून आणखी कोणी भारताला टार्गेट करत असेल अशी शक्यता नाकारता येणार नाही. भारताला स्पर्धक मानणारा चीनसारखा देशही या कटामागे असू शकतो. मित्र असल्याचे भासवणारे अमेरिका किंवा ब्रिटनसारखे देशही यात सामील नसतीलच असे ठामपणे सांगता येणार नाही.

एक गोष्ट मात्र नक्की, या प्रकरणात घरभेद्यांची मदत सोरोस प्रभूतींना झाली असणार यात शंका नाही. परंतु बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा पद्धतीने या प्रकरणावरून पडदा उठवायचा ठरवला तर मात्र बाब कठीण होऊन बसेल. याप्रकरणाचे दुवे सर्वसामान्यांपर्यंत येणे कठीण दिसते. परंतु बिटवीन द लाईन्सचा विचार केला तर द संडे गार्डीयनमध्ये लंडनमधील बैठकीचा जो तपशील दिला आहे, तो अशक्य वाटत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा