विद्यार्थ्यांच्या आक्रोशासमोर गुडघे टेकलेल्या ठाकरे सरकारतर्फे अखेर एमपीएससी परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रक काढत नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता एमपीएससीची पूर्व परिक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. २७ मार्च आणि ११ एप्रिल होणाऱ्या परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
रविवारी १४ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. पण परीक्षेच्या तीन दिवस आधी एक प्रसिद्धीपत्रक काढत ही परीक्षा पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले. यावेळी परीक्षेची पुढची तारीख जाहीर करण्यात आली नाही. या विरोधात राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतः फेसबूक लाईव्ह करत याबाबतची घोषणा केली. शुक्रवारी एमपीएससीची पुढची तारीख जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. सोबतच १४ तारखेची परीक्षा ही पुढच्या आठवड्यभरातच घेतली जाईल असेही ठाकरेंनी सांगितले होते. त्याप्रमाणे आता राज्य सेवा आयोगाने २१ मार्च ही परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली आहे.
हे ही वाचा:
शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरूवात
धार्मिक स्थळांच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांवर योगींचा दणका
२१ तारखेला परीक्षा झाल्या नाहीत तर वर्षा बंगल्यासमोर उपोषणाला बसणार – आमदार गोपीचंद पडळकर
“ठाकरे सरकार हे विश्वासघाताने सत्तेवर आलेले सरकार आहे. विश्वासघात हाच या सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे.” असा हल्लाबोल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. “आरक्षणाच्या बाबतीत या सरकारने विश्वासघात केला, वीज तोडणीच्या बाबतीत तेच केले आणि आता एमपीएसीच्या बाबतीतही सरकारने तेच केले आहे. सरकार हे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे. मी आणि हे विद्यार्थी लादेन समर्थक आहोत का? मग आम्हाला असे उचलून का नेले?” असा सवालही पडळकर यांनी विचारला आहे. जर २१ तारखेला परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन वर्षा बंगल्यासमोर उपोषण करेन असा इशाराही पडळकरांनी दिला आहे. तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २ वर्षाने वाढवावी आणि कोरोनाने पुढे ढकलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी सात हजार भत्ता द्यावा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.