मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात गोदरेज अँड बॉयस कंपनीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याच दिवशी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कामाची निविदा उघडण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालील भागासह २१ किमी लांबीचा बोगदा बांधण्याची निविदा गुरुवारी उघडण्यात आली. भारतातील हा पहिला समुद्राखालील बोगदा असेल.
हा मार्ग बांधून झाल्यानंतर बीकेसी ते शिळफाटा हे २१ किमीचे अंतर फक्त १० ते १२ मिनिटात पार करता येणार आहे. बुलेट ट्रेनच्या या कामासाठी एफकॉन आणि एल अँड टी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा बांधण्यात येणार आहे. बुलेट प्रकल्पाच्या मुंबई विभागात बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान २१ किमीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे ज्यामध्ये खाडीखालंच्या बोगद्यातील बुलेट मार्गाचा ७ किमीचा समावेश आहे.
दुहेरी ट्रॅक सामावून घेण्यासाठी हा सिंगल-ट्यूब बोगदा असेल. या बुलेट मार्गासाठी तांत्रिक निविदा सादर करण्यात आल्या असून, त्याची छाननी केल्यानंतर आर्थिक निविदा उघडून काही महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, खाडी परिसरातील खारफुटीचे संवर्धन करून मेट्रो बुलेट लाइनचे बांधकाम केले जाईल, असा दावा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने केला आहे.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
गुजरात आणि दादरा नगर हवेली दरम्यान बुलेट ट्रेनसाठी १०० % निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या ठिकाणी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून बुलेट रोडच्या कामासाठी आवश्यक असलेले खांब बसविण्याचे काम सुरू झाले आहे. गुजरातमध्ये १४० किमी लांबीचे खांब तयार करण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचे काम वेगवेगळ्या टप्प्यात केले जाणार आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन टर्मिनससाठी (सी १) आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून संबंधित कंत्राटदाराच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. १५ मार्च रोजी या निविदा उघडल्या जाणार आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातसारख्या राज्यातही प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.