पुण्यात गेल्या काही दिवसांत कोयता गँगच्या उच्छादाचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगच्या एकाला बदडून काढल्याचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता. आता सरकारने कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी कोयता विकत घेण्यासाठी आता आधार कार्ड द्यावे लागणार असा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. विशेष म्हणजे या गँगची कीड शाळांपर्यंतही पोहोचली आहे. त्यामुळे पोलिस याबाबत अधिक गंभीर झाले आहेत. मागे एका मुलाने प्रेमप्रकरणातून दुसऱ्या मुलावर कोयत्याने वार केले होते.
पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर परिसरात कोयता बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १८ कोयते हस्तगत करण्यात आले होते. रिक्षामध्ये हे कोयते ठेवण्यात आले होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवणसिंग भुरसिंग भादा ( वय ३५), गणेशसिंग हुमनसिंग टाक ( वय ३२) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
हे ही वाचा:
अदानी उद्योगसमुहाने बहुचर्चित एफपीओ घेतला मागे, भागधारकांचे पैसे करणार परत
भाजपाला पहिले यश; कोकण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
मतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय
आरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन
या गँगमधील तरुण कोयत्याचा धाक दाखवत दुकानात शिरतात, तिकडे तोडफोड करतात. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना भीती घालतात. ठेल्यांची तोडमोड करून दुकानदारांमध्ये भीती निर्माण करतात. शिवाय, या कोयत्यांच्या सहाय्याने लुटालूटही करतात. आता कोयता विकत घ्यायचा झाल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल. दुकानदाराने त्याची नोंद करणे आवश्यक आहे. कोयता खरेदी करण्यामागे काय कारण आहे. संशयास्पद काही आहे का, याची तपासणी पोलिस करणार आहेत.
पण हा निर्णय शहरापुरता आहे की, ग्रामीण भागातही आहे हे पाहणे आवश्यक ठरेल. कारण ग्रामीण भागात कोयते विकत घेऊन ते शहरात आणण्याचे प्रमाण वाढू शकेल.