मागील १४ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी सदिच्छा साने या कॉलेज तरुणीची हत्या झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपीने याची कबुली दिली आहे.
सदिच्छाची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली लाईफगार्ड मिथ्थु सिंह याने गुन्हे शाखेकडे दिली आहे. मिथ्थु सिंह आणि त्याचा आणखी एक साथीदार जब्बार या दोघांना मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९च्या पथकाने गेल्या आठवड्यात सदिच्छा साने प्रकरणात संशयावरून अटक केली होती. त्याच्या विरुद्ध अपहरण आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू होती,मात्र तो पोलिसांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या काही तांत्रिक पुराव्यावरून गुन्हे शाखेने त्याची उलटत तपासणी सुरू केली असता या उलटतपासणीत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याने सदिच्छा हिची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली.
हे ही वाचा:
फक्त मोदीच नाहीत, ठाकरेही विकास पुरूषच…
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा कायापालट होईल
मुघलांचे कर्दनकाळ धर्मवीर महाराणा प्रताप
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी आणि मुंबईतील सर जे. जे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या सदिच्छा साने ही विद्यार्थीनी १४ महिन्यांपूर्वी गुढरीत्या बेपत्ता झाली होती. तिचे शेवटचे लोकेशन हे मुंबईतील वांद्रे बँडस्टॅण्ड या ठिकाणी पोलिसांना सापडले होते.
मिथ्थु सिंह हा सदिच्छाला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता व त्याने तिच्यासोबत सेल्फी देखील काढली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांकडे ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करता येत नव्हती. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर तो पोलिसांच्या विरोधात मानव अधिकाराची धमकी देत होता. अखेर १४ महिन्यांनी पोलिसांच्या हाती काही तांत्रिक पुरावे मिळून आल्यानंतर त्याच्या विरोधात लुटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.