संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालेल. या ६६ दिवसांत २७ बैठका होणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
१४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत सुट्टी असेल असे त्यांनी ट्विट केले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत चालणार होते, परंतु नंतर सभागृहात गदारोळ झाल्याने ते थांबवण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकूण ६६ दिवसांत २७ बैठका होणार आहेत. या कालावधीत, विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करतील आणि त्यांची मंत्रालये आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होईल. यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान मोदी उत्तर देतील. यानंतर अर्थमंत्री सीतारामनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या अर्थतज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थतज्ज्ञांच्या सूचना घेऊन पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आणि त्यातील आव्हानांचे मूल्यांकन केले.लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आर्थिक सर्वेक्षणही मांडले जाईल.