बंगालचे राजकीय रणांगण चांगलेच पेटले आहे. ‘मिशन’ बंगाल यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. शनिवारी भाजपाने बंगाल विधानसभेसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी याला रिंगणात उतरवले आहे. ते नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी यांना टक्कर देतील.
सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांचे जुने सहकारी होते. तृणमुल सरकार मध्ये अधिकारी यांनी परिवहन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले आहे. डिसेंबर मध्ये त्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत तृणमुल सोडून भाजपा मध्ये प्रवेश केला. सुवेंदु हे २०१६ पासुन नंदीग्रामचे आमदार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नंदीग्राम मधून आपली उमेदवारी घोषित केली. ममता यांनी आपण भवानीपूर या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकत असल्याचे म्हटले होते. पण नंतर त्यांनी स्पष्ट केले की त्या एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवतील. भवानीपूर साठी त्यांनी पक्षातले सहकारी आणि पश्चिम बंगालचे ऊर्जा मंत्री सोवनदेब चटोपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाने सुवेंदू यांना मैदानात उतरवल्यामुळे नंदीग्रामची लढत ही खूप जास्त चुरशीची होणार असे म्हटले जात आहे.