25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामामनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?

मनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?

Google News Follow

Related

ठाणे नौपाडाचे रहीवासी मनसुख हिरेन याचा मुंब्र्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून गेला आहे. ठाण्याच्या या रहीवाशाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास बंद झाला होता असे त्याच्या कुटुंबियांनी उघड केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास त्याचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडला. मृतदेह पाण्यात फुगलेला नव्हता. मुनसुखच्या तोंडावर मास्क होता. त्याच्या तोंडावर काही रुमाल बांधल्याचे मास्क काढल्यानंतर कामगारांच्या लक्षात आले. ही मर्डर असल्याचे ते बोलतायत असा व्हीडीयोच समोर आला आहे. 

कळव्याच्या खाडीत आत्महत्या करण्यापूर्वी मनसुखने तोंडात रुमाल कोंबून त्यावर मास्क का लावला याची उकल होत नाही. मरणारा माणूस कोरोनाच्या व्हायरसला कशाला घाबरेल? त्याच्या तोंडात कोंबलेले रुमाल पाहील्यानंतर ही मर्डर आहे असे त्या कामगारांना वाटले, पोलिसांना ही शक्यता का वाटली नाही? पोस्ट मॉर्टमचा अहवाल हाती येण्याच्या आधी ठाण्याच्या पोलिस उपाआय़ुक्तांना ही आत्महत्या आहे असे जाहीर करण्याची इतकी घाई कशाला होती? मनसुख हिरेन हा अँटिलीया समोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणातला इतका महत्वाचा दुवा आहे हे माहीत झाल्यानंतर पोलिस इतक्या बेजबाबदारपणे कसे वागले? 

मनसुखने आत्महत्या केली यावर त्यांच्या पत्नी विमला यांचा विश्वास नाही. तो पट्टीचा स्वीमर होता, अशी माहिती त्याच्या भावाने उघड केली आहे. मृत्यूच्या चार दिवस पूर्वी त्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आय़ुक्त मुंबई आणि पोलिस आयुक्त ठाणे यांना पाठवलेल्या पत्रात आपला छळ होत असल्याचा आरोप मनसुखने केला आहे. मिड डेचा पत्रकार फैजान, एपीआय सचिन वाझेसह अनेक पोलिस अधिका-यांची नावे या पत्रात आहेत.

शुक्रवारी रात्री कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्याचे पोस्टमॉर्टम झाले. पोस्टमॉर्टेमच्या अहवालात त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे नोंदवण्यात आले. हा सगळाच मामला संशयास्पद आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत मनसुखच्या जीवाला धोका असल्याचे जाहीर केले आणि तासाभरात त्याचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडला. तो बेपत्ता असल्याची तक्रार हिरेन कुटुंबियांनी केली होती, त्यामुळे त्याची ओळख पटली.

मनसुख आणि एपीआय सचिन वाझे गेल्या सहा महिन्यात. एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहीती फडणवीस यांनी विधानसभेत उघड केली. वाझे या व्यापा-याच्या संपर्कात कधीपासून होते? बिघडलेली स्कॉर्पियो रस्त्यावर सोडून जाताना मनसुखने एखाद्या मेकॅनिकला फोन केला होता काय़?  

देशातील क्रमांक एकचा उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलीयासमोर एखादी दहशतवादी संघटना जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो उभी करते. इतक्या महत्वपूर्ण प्रकरणाचा तपास एका एपीआय दर्जाच्या अधिका-याला सोपवला जातो. क्राईम ब्रँचच्या सर्व युनिटला तपासात सहभागी करून घेतले जाते. अचानक हा तपास थांबवून तिस-याच दिवशी हा तपास क्राईम ब्रँचचे एसीपी नीतीन अलकनूरे यांच्याकडे दिला जातो, त्यानंतर लगेचच या प्रकरणातला महत्वाचा दुवा असलेल्या मनसुख हिरेनचा मृतदेह सापडतो हा सगळे दुवे नीट जुळत नाहीत. 

दहशतवादाच्या प्रकरणातील माहीती अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिस याबाबत माहिती उघड करायला फारसे उत्सुक नसतात. परंतु अँटिलीया प्रकरणात मात्र पोलिसांनी दहशतवादी संघटनेचे नाव जाहीर केले. (जैश ए हिंद), स्कॉर्पियोचा नंबर जाहीर केला. सीसी टीव्ही फूटेजमध्ये मिळालेला व्हीडीयो जाहीर केला. पोलिसांनी नाव जाहीर केलेल्या ‘जैश ए हिंद’ ने हे काम आपले नाही असा खुलासा केल्यानंतर पोलिसांची अवस्था अगदीच वाईट झाली. 

गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास पाहीला असता अशी आगाऊ सुचना देऊन दहशतवाद्यांनी स्फोट केल्याचे उदाहरण सापडत नाही. मग पोलिसांनी पत्रकारांना माहीती देताना इतकी घाई का केली हा प्रश्न समजण्या पलिकडचा आहे. हा सगळा घटनाक्रम प्रचंड संवेदनशील असताना पोलिस याप्रकरणाबाबत फारसे जबाबदारीने वागल्याचे दिसत नाही. 

मुकेश अंबानींसारखा उदयोगपती, स्फोटकांचे प्रकरण, दहशतवादी संघटनेच्या सहभागाची शक्यता असताना सचिन वाझे यांच्या सारख्या एपीआय दर्जाच्या अधिका-याकडे का सोपवण्यात आला याचा खुलासा मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी करायला हवा. वाझे यांचा इतिहास वादग्रस्त आहे. ते ख्वाजा युनस प्रकरणात आरोपी होते. त्या प्रकरणात ते बराच काळ निलंबित होते. त्यांना सेवेत परत घेण्याचा प्रस्ताव सहा ते सात वर्ष प्रलंबित होता. दत्ता पडसळगीकर, संजय बर्वे यांच्या पोलिस आय़ुक्त पदाच्या कारकीर्दीत वाझे यांना सेवेत परत घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर आला. परंतु दोघांनी याबाबत काहीच निर्णय घेतला नाही. परमबीर सिंह मुंबईच्या पोलिस आय़ुक्तपदी आल्यानंतर वाझे यांची पुन्हा एकादा पोलिस खात्यात वर्णी लागली. 

पोलिस खात्यात आल्यानंतर वाझे यांनी राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. ते पडले. परंतु वाझे यांचा राजीनामा नाकारून त्यांना पुन्हा एकदा पोलिस सेवेत बहाल करण्यात आले. वाझेंचे राजकीय आणि पोलिस सेवेत असलेले कनेक्शन इतके तगडे आहे. मनसुखच्या प्रकरणात वाझेंची एन्ट्री का झाली, कशी झाली त्याची उत्तरे या कनेक्शनमधून कदाचित मिळू शकतील. वाझेंनी त्यांच्या करीयरमध्ये फारशा महत्वाच्या केसवर काम केल्याचे उदाहरण नाही. तरीही इतकी महत्वाची केस त्यांच्याकडे का सोपवण्यात आली? आठवड्याभरात या केसमधून त्यांची उचलबांगडी का झाली? या प्रश्नांची उत्तरे सापडण्याची शक्यता कमीच. हायप्रोफाईल प्रकरणे अनुत्तरीत राहण्याचा इतिहास आपल्या देशात आहे. या प्रकरणात सामील असलेली काही बडी नावे लक्षात घेता, याप्रकरणातूनही काही निष्पन्न होईल अशी शक्यता कमीच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा